पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Central Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या वरिष्ठ पुरुष क्रिकेटपटूंना दरवर्षी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (केंद्रीय करार) प्रदान करते. बोर्ड खेळाडूंच्या सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरीच्या आधारे त्यांना चार श्रेणींमध्ये वर्गीकृत करते. बीसीसीआयकडून मिळणारी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची रक्कम केवळ खेळाडूंना आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही, तर मैदानावर उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देखील देते.
बीसीसीआयच्या ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना 7 कोटी रुपये, ‘ए’ ग्रेडमध्ये 5 कोटी रुपये, ‘बी’ ग्रेडमध्ये 3 कोटी रुपये आणि ‘सी’ ग्रेडमध्ये 1 कोटी रुपयांची रक्कम दिली जाते.
नियमानुसार, एखाद्या खेळाडूने एका वर्षात किमान 3 कसोटी सामने, 8 वनडे सामने किंवा 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले असावे लागतात. जर एखादा खेळाडू या अटींना पूर्ण करतो, तर त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला जातो.
टीम इंडियासाठी सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंचा ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये समावेश केला जातो. या खेळाडूंकडे संघाचे मुख्य सदस्य म्हणूनही पाहिले जाते. त्याचबरोबर, बीसीसीआयच्या निकषांनुसार जे खेळाडू विशिष्ट फॉरमॅटमध्ये भाग घेतात, त्यांना ‘सी’ ग्रेडमध्ये समाविष्ट केले जाते.
ग्रेड ए+ : रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ग्रेड ए : मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत.
ग्रेड बी : सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर.
ग्रेड सी : रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.