स्पोर्ट्स

गोलंदाजांनो, वर्कलोड वाढवा

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी एक फर्मान जारी केले आहे. मंडळाने आयपीएलमध्ये खेळणार्‍या गोलंदाजांना वर्कलोड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयपीएलनंतर टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मोठ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय गोलंदाजांना त्यांचा वर्कलोड दुप्पट करण्यास सांगितले आहे. गोलंदाजांनी एका आठवड्यात किमान 200 चेंडू टाकावेत आणि संबंधित अधिकार्‍यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते आहे. मंडळाच्या या निर्णयानंतर भारतीय गोलंदाज आयपीएलच्या दुसर्‍या भागात नेटमध्ये अधिकचा सराव आणि लाल चेंडूने गोलंदाजी करताना दिसतील.

भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले, 'जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी गोलंदाजांवर पुरेसा वर्कलोड असणे महत्त्वाचे आहे. इग्लंडमधील परिस्थिती पाहता भारतीय गोलंदाजांनी डब्ल्यूटीसीसाठी जय्यत तयारी करणे आवश्यक आहे.'

खास उपकरणाद्वारे भारतीय खेळाडूंवर बोर्डाची नजर

बीसीसीआयने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी एका उपकरणाचा वापर केला आहे. सराव करताना आणि सामने खेळताना सर्व खेळाडूंना हे उपकरण परिधान करावे लागत आहे. या उपकरणाच्या मदतीने खेळाडूंच्या फिटनेसशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. ज्यात खेळाडूची ऊर्जा पातळी, कव्हर केलेले अंतर, ब्रेक डाऊन होण्याचा धोका, हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादींवर लक्ष ठेवणे बोर्डाला सोपे जाणार आहे.

ही बाब फ्रँचायझींवर अवलंबून : रोहित शर्मा

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयपीएल सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या वर्कलोडवर महत्त्वाचे विधान केले होते. तो म्हणाला होता की, 'वर्कलोड ही बाब आता फ्रँचायझींवर अवलंबून आहे. ते आता खेळाडूंचे मालक आहेत. आम्ही फ्रँचायझींना याबाबत सूचना दिल्या आहेत. आता ते खेळाडूंवरही अवलंबून आहे. खेळाडू परिपक्व आहेत आणि त्यांना स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी लागेल. जर त्यांना फिटनेसची चिंता वाटत असेल तर त्यांनी फ्रँचायझींशी बोलून एक किंवा दोन सामन्यांचा ब्रेक घेणे गरजेचे आहे; पण असे काही घडेल असे मला वाटत नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT