पुढारी ऑनलाईन डेस्क : आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व स्मृती मानधना हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर दीप्ती शर्माला उपकर्णधार असेल. या मालिकेसाठी हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी शेफाली वर्माला पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. 10 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सर्व सामने सामने राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आपल्या फलंदाजीने खळबळ माजवणाऱ्या प्रतिका रावलला पुन्हा एकदा संघात संधी देण्यात आली आहे. या 24 वर्षीय खेळाडूने 3 डावात 44.66 च्या सरासरीने 134 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज तेजल हसबनीसला हिलाही संधी मिळाली आहे.
केवळ 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेली अष्टपैलू खेळाडू राघवी बिश्तचाही संघात समावेश करण्यात आला आहे. सायली सातघरे हिचा या मालिकेसाठी प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. भारताने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध व्हाईटवॉश नोंदवला. संघाला ही विजयी घोडदौड अशी सुरू ठेवायची आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान हरमनप्रीतलाही दुखापत झाली होती, त्यामुळे ती पुढील दोन सामने खेळू शकली नाही. मात्र, तिने वनडे मालिकेत पुनरागमन केले.
कॅरेबियन संघाविरुद्ध खेळलेल्या वनडे मालिकेत रेणुका मालिकावीर ठरली होती. तिने तीन सामन्यांत एकूण 10 विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिजपाठोपाठ आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठीही निवड समितीने शेफाली वर्माकडे दुर्लक्ष केले आहे. शेफाली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये ती चांगली कामगिरी करत आहे. 7 सामन्यांमध्ये शेफालीने आतापर्यंत 75.28 च्या सरासरीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 527 धावा केल्या आहेत. मात्र, असे असतानाही निवड समितीने शेफालीवर विश्वास दाखवलेला नाही. हरियाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शेफालीने 115 चेंडूत 197 धावांची शानदार खेळी केली.
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतीक रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा छेत्री (यष्ट्रीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिष्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे