Bangladesh Cricket News: बांगलादेशने भारतात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारतातील आपले सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यांनी यासाठी सुरक्षेचं कारण दिलं होतं. त्यानंतर आयसीसीने बांगलादेश क्रिकेट संघाऐवजी स्कॉटलँडच्या संघाला खेळण्याची संधी दिली होती. यामुळं बांगलादेश क्रिकेटचं अन् क्रिकेटपटूंचे मोठे नुकसान झालं होत.
आता नवीन सरकार आल्यानंतर बांगलादेशनं आपली भूमिका बदलली असून बीसीसीआय सोबतचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत आली आहे. त्या सरकारचे नवे क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी बीसीसीआय सोबतचे संबंध सुधारण्यास सुरूवात केली आहे. त्यांना भारतीय संघ जर बांगलादेश दौऱ्यावर आली तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे उत्पन्न किती वाढेल याची कल्पना आहे.
बांगलादेशचे माजी फुटबॉलपटू असलेल्या हक यांनी डॅमेड कंट्रोलसाठी योजना आखायला देखील सुरूवात केली आहे. त्यांनी भारताच्या डेप्युटी हाय कमिश्नरसोबत मैत्रीपूर्ण संवाद देखील सुरू केला आहे.
द डेली स्टाला दिलेल्या मुलाखतीत अमिनुल हक म्हणतात, 'मी पदभार स्विकारल्यानंतर त्वरित डेप्युटी हाय कमिश्नर ऑफ इंडिया यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आपापसातले विषय मैत्रीपूर्ण चर्चेतून सोडण्याबाबत चर्चा केली. आम्हाला आमच्या शेजारील राष्ट्रांसोबत चांगले नाते प्रस्थापित करायचं आहे. आम्ही क्रीडा विषयक अडचणी राजनैतिक संवादातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. क्रिकेटमध्ये आम्ही आयसीसीच्या नियमांचे पालन करण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहोत.'
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत आल्यावर अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी बीसीबीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपण वैयक्तिक कारणामुळं राजीनामा देत असल्याचं सांगितलं. ते राजीनामा दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. ऑस्ट्रेलियात त्यांचे कुटुंबीय राहतात.
दरम्यान, नवे क्रीडामंत्री हक यांनी बीसीबीच्या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता या निवडणुकीसाठी योग्य ती पावले उचलली जातील आणि याबाबतचा निर्णय हा चर्चेनंतर घेतला जाईल असं सांगितलं.
अनिमुल म्हणाले, 'मी यापूर्वीच सांगितलं होतं की क्रिकेट बोर्डातील निवडणूकीवर प्रश्नचिन्ह आहे. आम्ही आता याबाबत चर्चा करू आम्हाला याबाबतीत योग्य दिशेला जायचं आहे. यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलू.'
याचबरोबर अनिमुल यांनी बांगलादेश क्रिकेट वर्तुळात शाकिब अल हसन आणि मुश्रफी मोर्तझा यांनी परतावे अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब हा गेल्या दोन वर्षापासून देशात परतलेला नाहीत. तर मोर्तझा हा देखील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेला नाही. हे दोन्ही क्रिकेटपटू शेख हसीना यांच्या सरकारमध्ये खासदार होते.