ढाका : येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान बांगला देशने पाकिस्तानचा १०४ धावांनी धुव्वा उडवला आहे. विजयासाठी दिलेल्या २६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव पाचव्या दिवशी अवघ्या १६३ धावांत आटोपला. या विजयासह बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग तिसरा विजय नोंदवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
पाकिस्तानच्या पराभवामध्ये बांगलादेशचा उंचपुरा वेगवान गोलंदाज नाहिद राणा मुख्य शिल्पकार ठरला. राणाने आपल्या वेगाच्या जोरावर पाकिस्तानी फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने अवघ्या ९.५ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात ५ फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद, सऊद शकील, मोहम्मद रिझवान, नोमान अली आणि शाहीन शाह अफ्रीदी यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश होता. त्याला अनुभवी तस्किन अहमदने २ बळी घेत उत्तम साथ दिली, तर तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
विजयासाठी २६८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात इमाम-उल-हक अवघ्या २ धावांवर तस्किन अहमदचा बळी ठरला. त्यानंतर अजान अवैस आणि अब्दुल्ला फजल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अजान १५ धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच राहिले. अब्दुल्ला फजलने एका बाजूने किल्ला लढवत ११३ चेंडूंत ६६ धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली, ज्यात ११ चौकारांचा समावेश होता. सलमान अली आगाने २६ धावांचे योगदान दिले, परंतु या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने पहिल्या डावात कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या १०१ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ४१३ धावांचा डोंगर उभा केला होता. मोमिनुल हक (९१) आणि मुशफिकुर रहमान (७१) यांनीही मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव ३८६ धावांवर आटोपला, ज्यात अजान अवैसने शानदार शतक झळकावले होते. पहिल्या डावात बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने पाच बळी घेतले होते.
बांगलादेशने आपला दुसरा डाव ९ बाद २४० धावांवर घोषित करून पाकिस्तानला २६८ धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावातही बांगलादेशचा कर्णधार शांतोने ८७ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासने पहिल्या डावात पाच बळी घेतले होते, तर दुसऱ्या डावात हसन अली आणि नोमान अली यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. मात्र, अखेरच्या डावात फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला.