IPL 2025 Ayush Mhatre CSK latest news |
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा युवा खेळाडू आयुष म्हात्रेने आयपीएल २०२५ च्या पदार्पणात मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध मोठी छाप पाडली. त्याने १५ चेंडूत ३२ धावा केल्या, त्यात चार चौकार आणि दोन षटकार मारले. ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात स्थान मिळालेला म्हात्रे, संघाच्या सराव सत्रातही वरिष्ठ खेळाडूंच्या नजरेत भरत आहे. सीएसकेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, म्हात्रेने नेट्समध्ये खेळलेल्या काही फटक्यांचे रवींद्र जडेजाने कौतुक केले.
व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा आयुष म्हात्रेच्या मागे नेट्समध्ये उभा आहे. १७ वर्षीय म्हात्रेने काही शॉट्स लगावताच, जडेजाने कौतुक केले. म्हात्रेने त्याच्या पदार्पणात लक्ष वेधले आहे. आयपीएलमधील त्याच्या पहिल्या चार चेंडूत १६ धावा काढल्या आणि अखेर ३२ धावा केल्या होत्या. दरम्यान, शिवम दुबे आणि जडेजाच्या तडाखेबाज खेळी आणि अर्धशतकांनंतरही सीएसकेला सामना गमवावा लागला.
सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत मोठा ऐतिहासिक विजय मिळवला. हैदराबादने चेन्नईवर ५ विकेटस् आणि ८ चेंडू शिल्लक ठेवत विजयाची नोंद केली. 'आयपीएल'च्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हैदराबादने चेन्नईचा चेपॉकवर पराभव केला. फॉर्मात नसलेल्या नितीश रेड्डीने आणि कामिंद मेंडिसने अखेरच्या षटकांमध्ये संघाला विजयापर्यंत नेले.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबाद समोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग हैदराबादने १८.४ षटकांत ५ विकेटस् गमावत पूर्ण केला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहोचला आहे, तर सातव्या पराभवामुळे आधीच तळात असलेल्या 'सीएसके' संघाची वाट बिकट झाली असून, त्यांचे पॅकअप झाल्यातच जमा आहे.