Women's T20 Cricket | ऑस्ट्रेलियाच्या लॉरा हॅरिसचे अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक! File photo
स्पोर्ट्स

Fastest Fifty Women Cricket | ऑस्ट्रेलियाच्या लॉरा हॅरिसचे अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक!

महिला टी-20 क्रिकेटमधील जागतिक विक्रमाशी बरोबरी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाची फलंदाज लॉरा हॅरिसने रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक कुटत महिला टी-20 क्रिकेटमधील वेगवान अर्धशतकाच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमधील अलेक्झांड्रा येथील मॉलिनक्स पार्कवर सुरू असलेल्या ‘विमेन्स सुपर स्मॅश’ स्पर्धेत कँटर्बरीविरुद्ध ओटागो संघातर्फे 35 वर्षीय हॅरिसने हा पराक्रम गाजवला.

हॅरिसने यासह इंग्लंडच्या मेरी केलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. केलीने 2022 मध्ये वॉर्विकशायरकडून खेळताना ग्लूस्टरशायरविरुद्ध 15 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. ओटागो संघाकडून पदार्पण करणार्‍या हॅरिसने 17 चेंडूंत 52 धावांची खेळी केली. या स्फोटक खेळीत तिने 6 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार ठोकले. अखेर कँटर्बरीची जलद गोलंदाज गॅबी सुलिव्हनने तिला बाद केले.

लॉरा हॅरिसच्या या झंझावाती खेळीमुळे ओटागोने 146 धावांचे लक्ष्य केवळ 14.5 षटकांत 6 गडी राखून पूर्ण केले. तिच्या या शानदार कामगिरीसाठी तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. एकूण कारकिर्दीचा विचार करता, अनुभवी लॉरा हॅरिसने 133 बिग बॅश सामने खेळले असून, 160.76 च्या स्ट्राईक रेटने 1344 धावा केल्या आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय टी-20 तील विक्रम सोफीच्या खात्यावर

आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमधील वेगवान अर्धशतकाचा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनच्या नावावर आहे. तिने 2015 मध्ये भारताविरुद्ध बंगळूर येथे 18 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाची फोबी लिचफिल्ड आणि भारताची रिचा घोष यांनीही 18 चेंडूंत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. लिचफिल्डने 2023 मध्ये सिडनी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध, तर रिचा घोषने 2024 मध्ये नवी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्धच ही कामगिरी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT