Australia women cricketers
इंदूर: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या दौऱ्यादरम्यान इंदूरमध्ये मोठी सुरक्षा चूक समोर आली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लू येथून एका कॅफेकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंशी एका तरुणाने छेडछाडीचा प्रयत्न केला. या तरुणाने त्यांची गाडी अडवून त्यांना चुकीचा स्पर्श केला, तसेच त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. या गंभीर घटनेमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटू हॉटेल रॅडिसन ब्लू मधून नेहरूगडच्या कॅफेच्या दिशेने जात होत्या. हॉटेलपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून थांबवले. त्याने दोन्ही खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी त्वरित आपल्या टीमचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला. सिमन्स यांनी खेळाडूंना लाईव्ह लोकेशन आणि एसओएस अलर्ट पाठवण्यास सांगितले. त्यांनी संदेशात लिहिले की, ‘एक माणूस आमच्या मागे बाईकवरून येत आहे आणि पकडण्याचा प्रयत्न करत आहे.’ एसओएस संदेश मिळताच सुरक्षा अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी बाईकस्वार तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर हॉटेल आणि कॅफेच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आरोपी अटकेत
सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत बाईकस्वार आरोपी अकील याला पकडले. सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीनंतर एमआयजी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.
खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या दौऱ्यादरम्यान अशा प्रकारची घटना घडल्याने इंदूरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॉटेलपासून कॅफेपर्यंतचा रस्ता मोकळ्या परिसरात असूनही तिथे पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते, असे दिसून आले आहे. या घटनेनंतर टीम मॅनेजमेंटनेही सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.