स्पोर्ट्स

Indw vs Ausw : ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने (Indw vs Ausw) दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी भारतीय महिला संघावर 6 विकेटस्नी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या, त्यानंतर पाहुण्या संघाने ही धावसंख्या एक षटक शिल्लक ठेवून गाठली. उभय संघांमधील निर्णायक सामना उद्या मंगळवारी होणार आहे.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत भारतीय बॅटर्सना चांगलीच लगाम घातली. भारताला पहिला धक्का दुसर्‍या षटकात 4 धावांवर बसला. तेथून पुढे भारतीय संघ सावरलाच नाही. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडत राहिल्या. भारताला 20 षटकांत 8 बाद 130 धावा करता आल्या. दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 30 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या किम ग्राथ, अ‍ॅनाबेल सुदरलँड आणि जॉर्जिया वेरेहॅम यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.

हे सोपे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाला फारसे कष्ट पडले नाहीत. त्यांच्या अ‍ॅलिसा हिली (26), बेथ मुनी (20), ताहिला मॅकग्रा (19), अ‍ॅलिसा पेरी (34) यांनी 19 व्या षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

संक्षिप्त धावफलक (Indw vs Ausw)

भारत : 20 षटकांत 8 बाद 130 धावा. (दीप्ती शर्मा 30, रिचा घोष 23. किम ग्राथ 2/27.)
ऑस्ट्रेलिया : 19 षटकांत 4 बाद 133 धावा. (अ‍ॅलिसा पेरी 34, अ‍ॅलिसा हिली 26. दीप्ती शर्मा 2/22.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT