सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार
सामन्यांच्या वेळेवरही एक नजर टाकणे आवश्यक
पाच सामन्यांच्या T20 मालिकेची उत्सुकता शिगेला
australia vs india t20i series full schedule match timing change
भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. ज्यात यजमान कांगारू संघाने 2 विरुद्ध 1 असा विजय मिळवला. उभय संघांमध्ये आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या पाच सामन्यांच्या T20 मालिकेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, टी-२० मध्ये टीम इंडिया नक्कीच जोरदार पलटवार करण्याच्या तयारीत आहे. हे सामने कधी खेळले जाणार आहेत, याची माहिती जाणून घ्या. तसेच, सामन्यांच्या वेळेवरही एक नजर टाकणे आवश्यक आहे, अन्यथा सामना पाहायचा राहू शकतो.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा थरार २९ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. ही मालिका पाच सामन्यांची असल्यामुळे ती ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालेल. या मालिकेसाठी भारतीय संघात बदल झालेले दिसतील. वनडे मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तर आता टी-२० मध्ये कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादव यांच्या हाती असेल. या मालिकेत नवीन आणि युवा खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळेल. मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. यानंतर पुढील सामने कधी आणि कुठे होणार आहेत, याचीही नोंद करून घ्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी मालिकेतील तिसरा सामना होबार्ट येथे खेळवण्याचे निश्चित झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी मालिकेतील चौथा सामना गोल्ड कोस्ट येथे होईल. त्यानंतर, ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाईल. या सामन्यासह या दीर्घ मालिकेची सांगता होईल.
वनडे मालिका सुरू असताना, भारतीय वेळेनुसार सामने सकाळी ९.३० वाजता सुरू व्हायचे आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपत होते. परंतु, आता टी-२० मालिकेचे सामन्यांसाठी वेळेत मोठा बदल झाला आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील. म्हणजेच, सामन्याचा पहिला चेंडू पाऊणे दोन वाजता टाकला जाईल. या वेळेच्या अर्धा तास आधी, म्हणजे १ वाजून १५ मिनिटांनी टॉस होईल. हे सामनेही सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे.
भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. तर थेट लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.