स्पोर्ट्स

VIDEO : ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात राडा! खेळाडूंमध्ये बाचाबाची; थेट पंचांनाच करावी लागली मध्यस्थी

व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

रणजित गायकवाड

डार्विन : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये तीव्र वाद पाहायला मिळाला. दोन्ही संघांतील खेळाडू आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा वाद वेळीच नियंत्रणात आणला. दुसऱ्या दिवसाच्या खेळातील अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन मिराज यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र सुरू असताना मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. स्टार्कच्या एका चेंडूवर मिराज धाव घेण्यासाठी धावला असता, 'फॉलोथ्रू'मध्ये स्टार्क त्याच्यावर संतापला आणि हे माझे 'फॉलोथ्रू'चे क्षेत्र असल्याचे म्हणाला. यावरून दोन्ही खेळाडू समोरासमोर आले. मिराजनेही यावर प्रत्युत्तर देत आपण जाणूनबुजून आडवे आलो नसल्याचे स्पष्ट केले आणि 'हे तुमचे फॉलोथ्रू क्षेत्र नाही' असे सुनावले.

यामुळे स्टार्कचा पारा अधिकच चढला आणि त्याने मिराजला 'पिचवरून बाजूला हो' असे सांगत धावण्याची निश्चित रेषा दाखवली. तसेच मिराजला त्याच्या निर्धारित रेषेतच धावण्याचा सल्ला दिला. स्टार्क अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतानाच पंचांनी त्वरित मध्यस्थी केली. पंचांनी दोन्ही खेळाडूंना शांत राहून खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, ज्यामुळे हा वाद अधिक वाढला नाही.

दिवसाचा खेळ संपण्यास काहीच वेळ शिल्लक असल्याने हा वाद फार ताणला गेला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मेहदी हसन मिराज ७३ चेंडूंत ३ चौकारांसह ३२ धावांवर नाबाद खेळत होता. त्याला दुसऱ्या टोकाकडून हसन महमूदची साथ लाभली असून तो ७६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावांवर नाबाद आहे. आता तिसऱ्या दिवशी जेव्हा खेळाला नव्याने सुरुवात होईल, तेव्हा स्टार्क आणि मिराज पुन्हा आमनेसामने येतील, त्यामुळे या दोघांमधील द्वंद्व कसे रंगते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दरम्यान, सामन्याचा विचार करता बांगलादेशने सामन्यावर आपली पकड अत्यंत मजबूत केली आहे. बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात ६ गडी गमावून ३५१ धावा उभारल्या असून त्यांच्याकडे १५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी जमा झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांत आटोपल्याने, आता बांगलादेशच्या या भक्कम धावसंख्येला ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात कसे प्रत्युत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT