स्पोर्ट्स

Australia equals india's World Record : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराक्रम! T20 मध्ये भारताच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Australia vs West Indies T20 : कांगारू संघाने क्रिकेटजगतात नवा इतिहास रचला आहे.

रणजित गायकवाड

ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या एका मोठ्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. या विजयामुळे कांगारू संघाने क्रिकेटजगतात नवा इतिहास रचला आहे.

रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय

सेंट किट्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या सलग चौथ्या विजयात कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मोलाचा वाटा उचलला. ग्रीन आणि इंग्लिस यांनी महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली, तर ग्लेन मॅक्सवेलने केवळ 18 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 1 षटकारासह 47 धावांची तुफानी खेळी केली. या शानदार खेळीबद्दल मॅक्सवेलला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने हे मोठे लक्ष्य 19.2 षटकांतच पूर्ण केले. सलग दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.

भारताचा विश्वविक्रम धोक्यात

या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सातव्यांदा २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले आहे. यापूर्वी, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा (7 वेळा) 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केवळ भारतीय संघाच्या नावावर होता. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ प्रत्येकी 7 विजयांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

जर मालिकेतील अखेरच्या आणि पाचव्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाने 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले, तर भारताचा हा विश्वविक्रम मोडीत निघेल आणि ऑस्ट्रेलिया या यादीत अव्वल स्थानी पोहोचेल.

यजमान संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ या संपूर्ण वेस्ट इंडिज दौऱ्यावर आतापर्यंत अपराजित राहिला आहे. कसोटी मालिकेत 3-0 ने निर्भेळ यश मिळवल्यानंतर, आता टी-20 मालिकेतही ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेप्रमाणेच टी-20 मालिकेतही 'क्लीन स्वीप' देण्याकडे कांगारू संघाचे लक्ष असेल. दुसरीकडे, यजमान वेस्ट इंडिज संघ मालिकेतील अखेरच्या सामन्यात विजय नोंदवून आपला सन्मान वाचवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 200+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ

  • भारत : 7 वेळा

  • ऑस्ट्रेलिया - ७ वेळा

  • दक्षिण आफ्रिका : 5 वेळा

  • बल्गेरिया : 5 वेळा

  • पाकिस्तान : 4 वेळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT