Women's T20 World Cup | सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषक विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव  
स्पोर्ट्स

Women's T20 World Cup | सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषक विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव

फायनलमध्ये इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव; बेथ मुनी, फोएबे लिचफिल्डची फटकेबाजी

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : महिला क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक लॉर्डस्‌ मैदानावर आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवला आणि या दणदणीत विजयासह विक्रमी सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर अनुभवी बेथ मुनी आणि युवा फोएबे लिचफिल्ड यांनी डावाची धुरा सांभाळली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. लिचफिल्डने ३५ चेंडूंत ४८ धावांची आक्रमक खेळी केली, तर मुनीने ४९ चेंडूंत ६४ धावांचे मॅचविनिंग योगदान दिले.

सोफी एक्लेस्टोनने या दोन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये अनुभवी एलिस पेरीच्या झेलवरून काही काळ वाद निर्माण झाला होता. एक्लेस्टोनने घेतलेला झेल तिसऱ्या पंचांनी अयोग्य ठरवल्याने पेरीला जीवदान मिळाले. यानंतर पेरी आणि ॲशले गार्डनर यांनी कोणतीही चूक न करता ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने आले होते आणि प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियन संघानेच बाजी मारली आहे. आतापर्यंत झालेल्या १० आवृत्त्यांपैकी ७ वेळा जेतेपद पटकावून ऑस्ट्रेलियाने या फॉरमॅटवरील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

संक्षिप्‍त धावफलक

इंग्‍लंड : २० षटकांत ४/१५० (नॅट स्‍कायव्‍हर ब्रंट ५८, फ्रेया केम्‍प नाबाद ४४). ऑस्‍ट्रेलिया : १७.१ षटकांत ३/१५३. (बेथ मुनी ६४, लिचफिल्‍ड ४८).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT