स्पोर्ट्स

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन महिलांचा एकतर्फी मालिकाविजय, ॲलिसा हिलीची ऐतिहासिक दीडशतकी खेळी

Australia vs India Women ODI : भारताचा 3-0 फरकाने धुव्वा

रणजित गायकवाड

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या वन डे सामन्यात 158 धावांची वादळी खेळी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व शेवटच्या वन डेत भारताचा 185 धावांनी मोठा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या भारतीय संघाचा 3-0 असा ‌‘व्हाईट वॉश‌’ केला.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 409 धावांचा डोंगर रचला. 35 वर्षीय हिलीने केवळ 98 चेंडूंत 158 धावा कुटल्या. तिच्या या झुंजार खेळीत तब्बल 27 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. तिला बेथ मुनीने (नाबाद 106) खंबीर साथ दिली. या सामन्यात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. श्री चरणीने 10 षटकांत 2 बळींसाठी तब्बल 106 धावा मोजल्या, तर स्नेह राणाने 66 धावांत 2 बळी घेतले. काशवीला देखील एका बळीसाठी 83 धावांचे मोल मोजावे लागले.

भारतीय फलंदाजी ढेपाळली

410 धावांचे अशक्यप्राय आव्हान घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ 45.1 षटकांत 224 धावांवर गारद झाला. अनुभवी स्मृती मानधना शून्यावर बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (42) आणि स्नेह राणा (44) यांनी काही काळ प्रतिकार केला, पण तो अपुरा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या ॲलाना किंगने 33 धावांत 4 बळी घेत भारताचे कंबरडे मोडले. जॉर्जिया वेरहॅमने 3 धावांत 2 तर निकोला, ॲनाबेल, ॲश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलियन महिला : 7 बाद 409(ॲलिसा हिली 98 चेंडूंत 27 चौकार, 2 षटकारांसह 158, बेथ मुनी 84 चेंडूंत 10 नाबाद 106).

  • भारतीय महिला : 45.1 षटकांत सर्वबाद 224 (स्नेह राणा 44, जेमिमा रॉड्रिग्ज 42; ॲलाना किंग 4/33).

हिलीचा दिमाखदार निरोप

126 वन डे सामन्यांत 3,777 धावा व 8 शतके नोंदवून हिलीने वन डे क्रिकेटला विजयी निरोप दिला. 6 मार्चपासून पर्थमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या एकमेव ‌‘पिंक बॉल‌’ कसोटीनंतर ती पूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT