सिडनी : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट जगतात आतापासूनच रणधुमाळी सुरू झाली आहे. या महाकुंभासाठी ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) गुरुवारी (दि. १) आपला १५ सदस्यीय प्रारंभिक संघ जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. भारत आणि श्रीलंकेच्या फिरकीला पोषक खेळपट्ट्या लक्षात घेता, ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी आपल्या ताफ्यात फिरकीपटूंची मोठी फौज सामील केली आहे. मिचेल मार्शच्या खांद्यावर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि आक्रमक फलंदाज टिम डेव्हिड यांचे संघात पुनरागमन झाले आहे. कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत असून, त्याच्या फिटनेसवर वैद्यकीय पथकाचे बारीक लक्ष आहे. हेझलवूड आणि डेव्हिडदेखील दुखापतींनंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज आहेत. निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, स्पर्धेच्या शुभारंभापर्यंत हे तिन्ही प्रमुख खेळाडू पूर्णपणे फिट होतील.
भारत आणि श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीसाठी नंदनवन मानल्या जातात. ही बाब लक्षात घेऊन कांगारूंनी अॅडम झाम्पा आणि मॅथ्यू कुह्नमन यांच्यासह संघात फिरकी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलची अष्टपैलू कामगिरी संघासाठी कळीची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या संघात जोश इंग्लिस हा एकमेव यष्टिरक्षक आहे.
मिचेल ओवन आणि बेन ड्वारहुईस यांना संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता ‘कांगारू’ आशियाई भूमीवर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा चषक उंचावणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
विश्वचषकाच्या मैदानात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू मोठे आव्हान उभे करू शकतात.
१. ट्रेव्हिस हेड : २०२३ च्या वनडे विश्वचषकातील जखम भारतीय चाहते विसरलेले नाहीत. हेडची स्फोटक फलंदाजी भारतासाठी पुन्हा धोकादायक ठरू शकते.
२. पॅट कमिन्स : आयपीएलच्या अनुभवामुळे भारतीय खेळपट्ट्यांचा कोपरा न कोपरा कमिन्सला ठाऊक आहे.
३. ग्लेन मॅक्सवेल : 'द बिग शो' म्हणून ओळखला जाणारा मॅक्सवेल कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवू शकतो.
४. मिचेल मार्श : कर्णधार मार्शचा फॉर्म आणि भारतीय मैदानावरील त्याचा अनुभव भारताला अडचणीत टाकू शकतो.
५. ॲडम झम्पा : झम्पाची गुगली आशियाई खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची परीक्षा घेणारी ठरेल.
टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाला 'ग्रुप बी' मध्ये स्थान देण्यात आले असून त्यांचे सामने कोलंबो आणि पल्लेकेले येथे रंगणार आहेत.
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुह्नमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा.