ब्रिजटाऊन; वृत्तसंस्था : टिम डेव्हिडने अवघ्या 37 चेंडूंत नाबाद 102 धावांची वादळी खेळी फटकावल्यानंतर या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा तिसर्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 23 चेंडू राखून धुव्वा उडवला. 215 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिडने तब्बल 11 षटकार ठोकले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करणार्या वेस्ट इंडिजने शाई होपच्या (102) शानदार शतकाच्या जोरावर 20 षटकांत 214 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्ये मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांचे बळी अवघ्या 65 धावांत गमावले. यानंतर फलंदाजीला आलेल्या टिम डेव्हिडने मात्र सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने मैदानावर अक्षरशः चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या 16 चेंडूंत ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला.
गुडाकेश मोती याच्या एकाच षटकात सलग चार षटकार ठोकत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. मिचेल ओवेनसोबत (नाबाद 36) त्याने अभेद्य भागीदारी रचत संघाला विजयाच्या दिशेने नेले. डेव्हिडने 17 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि त्याचबरोबर संघाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले.
वेस्ट इंडिज : 20 षटकांत 4 बाद 214 (शाई होप 102, ब्रँडन किंग 62; नॅथन एलिस 1/37)
ऑस्ट्रेलिया : 16.1 षटकांत 4 बाद 215 (टिम डेव्हिड 102*, मिचेल ओवेन 36*; रोमारियो शेफर्ड 2/39)