पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK T20 Series : जोश इंग्लिशच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान कांगारूंनी 3 सामन्यांच्या मालिकेत पाकचा क्लीन स्वीप केला.
होबार्ट मैदानावर पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मोहम्मद रिझवानच्या जागी पाकिस्तान संघाचे नेतृत्व आगा सलमानकडे होते. तो शेवटच्या सामन्यात संघाला विजयापर्यंत नेईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. त्यांचा डाव 18.1 षटकात 117 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 118 धावांचे लक्ष्य होते. जे या संघाने 11.2 षटकात 3 विकेट गमावत आरामात गाठले आणि 7 विकेट्स राखून सामना जिंकला. मार्कस स्टॉइनिसने 27 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 61 धावांची तुफानी खेळी केली.
टी-20 मालिकेपूर्वी, उभय संघादरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने 2-1 ने असा विजय मिळवला होता. पण ऑस्ट्रेलियाने बदला घेत 3 सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. मॅथ्यू शॉर्ट (2) दुसऱ्याच षटकात शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. जेक फ्रेझर-मॅकगर्क (11 चेंडूत 18) चौथ्या षटकात बाद झाला. त्याला जहानदाद खानने पायचीत केले. अशा स्थितीत स्टॉइनिसने कर्णधार जोश इंग्लिश (24 चेंडूत 27) सोबत डाव सांभाळला. अष्टपैलू स्टॉइनिसने सुरुवातीला थोडा संयम दाखवला पण नंतर पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. त्याने नवव्या षटकात हारिस रौफविरुद्ध दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. दहाव्या षटकात अब्बास आफ्रिदीने इंग्लिशला बाद केले.
इंग्लिशची विकेट पडल्यानंतरही स्टॉइनिसने आक्रमकता काय ठेवली. त्याने 11व्या षटकात शाहीनचा सामना करताना एक चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी अब्बासने टाकलेल्या 12व्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टॉइनिसने षटकार ठोकला. तो मोठा फटका मारून सामना संपवण्याच्या प्रयत्नात होता, पण तसे होऊ शकले नाही. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही आणि तिसरा चेंडू नो-बॉल ठरला. ज्यामुळे कांगारू संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. ऑस्ट्रेलियाने 52 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. जो पाकिस्तानविरुद्धचा टी-20 मध्ये सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला दुसरा सर्वात मोठा विजय आहे. स्टॉइनिसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. बाबर आझम आणि हसिबुल्लाह खान वगळता पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप झाले. सलामीवीर म्हणून आलेल्या बाबरने 28 चेंडूत 4 चौकारांसह 41 धावांची खेळी केली. त्याने हसिबुल्लाह (19 चेंडूत 24) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली.
7 व्या षटकात हसिबुल्लाह बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या विकेट्सची पडझड थांबली नाही. बाबर 13व्या षटकात बोल्ड झाला. सलामीवीर साहिबजादा फरहान (2), उस्मान खान (3) आणि कार्यवाहक कर्णधार आग सलमान (1) यांच्यासह सहा खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे ॲरॉन हार्डीने तीन तर स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जॉन्सनला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने मालिकेत एकूण 8 विकेट्स घेतल्या.