पर्थ : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे बहुप्रतीक्षित पुनरागमन अवघ्या 22 चेंडूंमध्येच संपुष्टात आल्यानंतर येथील पहिल्या वन डे लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला 7 गडी राखून नमवत मालिकेत दणकेबाज विजयी सलामी दिली. सातत्याने पावसाचा व्यत्यय येत राहिलेल्या या लढतीत भारताला निर्धारित 26 षटकांत 9 बाद 136 धावांवर समाधान मानावे लागले, तर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 21.1 षटकांत 3 बाद 131 धावांसह विजय संपादन केला.
विजयासाठी 137 धावांचे आव्हान असताना ऑस्ट्रेलियातर्फे 52 चेंडूंत 2 चौकार व 3 उत्तुंग षटकारांसह 46 धावा केल्या आणि तोच ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरीदेखील ठरला. सहकारी सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (8) व मॅथ्यू शॉर्ट (8) अतिशय स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला लागोपाठ धक्के सहन करावे लागले. मात्र, एक बाजू लावून धरणाऱ्या मार्शने नंतर जोश फिलीपसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी साकारत विजयाचे दरवाजे सताड उघडून दिले. फिलीप तिसऱ्या गड्याच्या रूपाने बाद झाला. पण, भारतासाठी या सामन्यातील हे शेवटचे यश ठरले. त्यानंतर मार्शने मॅट रेनशॉसह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रेनशॉने 24 चेंडूंत 1 चौकार, 1 षटकारासह 24 धावा जमवल्या.
तत्पूर्वी, रोहित शर्मा व विराट कोहली या दोन्ही फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे संडे ब्लॉकबस्टर लढतीची अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली. फलंदाजीसाठी पोषक भासणाऱ्या ऑप्टस या नव्या स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, पावसामुळे वारंवार आलेल्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 26 षटकांचा करण्यात आला. यात भारताने 9 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली. यजमान संघाला 131 धावांचे सुधारित डकवर्थ-लुईस-स्टर्न लक्ष्य मिळाले.
अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच ट्रॅव्हिस हेडला डीप थर्ड मॅनवर हर्षित राणाकरवी झेलबाद केले. मॅथ्यू शॉर्टदेखील कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान न देता तंबूत परतला. मात्र, कर्णधार मिचेल मार्शने (नाबाद 46, 52 चेंडू) आपल्या ताकदीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला सामन्यात नियंत्रणात ठेवले. त्याने जोश फिलीपसोबत (29 चेंडूंत 37 धावा) 55 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
भारतीय वेगवान गोलंदाजीचे त्रिकूट - अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा - ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या अचूकतेची बरोबरी करण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी वारंवार दिशाहीन चेंडू टाकले. मार्शने याचा फायदा घेत तिन्ही वेगवान गोलंदाजांना प्रत्येकी एक षटकार ठोकला. सिराजच्या गोलंदाजीवर कव्हर्सवरून मारलेला त्याचा इनसाईड-आऊट लॉफ्टेड फटका विशेष लक्षवेधी ठरला. फिलीपने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, हवामानाचा व्यत्यय आणि ऑस्ट्रेलियाच्या नव्या चेंडूवरील भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या डावाला मोठा फटका बसला. के. एल. राहुलचा (30 चेंडूंत 38 धावा) प्रतिकार हा भारतीय फलंदाजीसाठी या लढतीतील एकमेव दिलासा ठरला.
अक्षर पटेल (31) आणि राहुल यांच्यातील पाचव्या गड्यासाठी झालेल्या 39 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा डाव काहीसा सावरला, पण फिरकीपटू मॅथ्यू कुन्हेमनने अक्षरला बाद केले. राहुलने उसळत्या चेंडूंवर चांगले नियंत्रण दाखवत एलिसला सलग दोन चौकार मारले. फिरकीपटू गोलंदाजीला आल्यानंतर राहुलने धावगती वाढवली आणि मॅथ्यू शॉर्टला सलग दोन षटकार ठोकले. त्याने आणि वॉशिंग्टन सुंदरने सहाव्या गड्यासाठी 30 धावा जोडल्या; परंतु मर्यादित षटकांमध्ये नियमित अंतराने गडी गमावल्यामुळे भारताच्या अखेरच्या षटकांतील धावगतीला लगाम बसला.
भारतासाठी आपला 500 वा सामना खेळणारा रोहित शर्मा (8) कर्णधार शुभमन गिलसोबत मैदानात उतरला तेव्हा पर्थच्या प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले. त्याने मिचेल स्टार्कला एक मनमोहक स्ट्रेट ड्राईव्ह मारून आपल्या जुन्या शैलीची आठवण करून दिली, पण त्याची खेळी लवकरच संपुष्टात आली, जेव्हा जोश हेझलवूडच्या उसळत्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड लागली आणि पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू रेनशॉने दुसऱ्या स्लीपमध्ये झेल घेतला.
कोहलीचे स्वागत आणखी मोठ्या जल्लोषात झाले, पण तो देखील खास खेळी साकारू शकला नाही. सामन्यापूर्वीच्या संभाषणात त्याने म्हटले होते की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच त्याचा सर्वोत्तम खेळ बाहेर येतो. मात्र, यावेळी स्टार्कच्या ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात कूपर कॉनोलीने बॅकवर्ड पॉईंटवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. ऑस्ट्रेलियातील त्याचा हा पहिलाच वन डेतील ‘डक’ ठरला.
आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या तुलनेत गिल अधिक संयमी दिसत होता. मात्र, नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर फ्लक मारण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टिरक्षक फिलीपकडे झेल दिल्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. उपकर्णधार श्रेयस अय्यरही त्याच पद्धतीने हेझलवूडच्या बाऊन्सरवर फिलीपकडे झेल देऊन बाद झाला. यामुळे भारताची अवस्था 14 व्या षटकात 4 बाद 45 अशी झाली.