ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तपासणीमध्ये त्याची पाठ दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे, आता स्टीव्ह स्मिथ संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसण्याची शक्यता आहे.
ॲशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला हा एक मोठा झटका बसला आहे. कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखण्यामुळे २१ नोव्हेंबर पासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’च्या वृत्तानुसार, कमिन्स संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारणामुळे, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ संभाव्य कार्यवाहक कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळू शकतात.
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणात बदल निश्चित मानले जात आहेत. ॲशेस मालिकेला २१ नोव्हेंबर रोजी पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीने सुरुवात होईल. मालिकेतील शेवटचा सामना ४ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.
कमिन्स कॅरिबियन दौऱ्यापासून (जुलै २०२५) पाठीच्या त्रासाने त्रस्त आहेत. अलीकडे केलेल्या स्कॅनिंगमध्ये त्याच्या कंबरेच्या हाडावरील स्ट्रेस हॉट स्पॉट पूर्णपणे बरा झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या तो गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
वृत्तानुसार, जर पॅट कमिन्स संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्यास, स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करू शकतो. त्याचबरोबर, गोलंदाजी आक्रमणात स्कॉट बोलँडला संधी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि नॅथन लायन यांचा संघात समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे.
पॅट कमिन्सचे बाहेर होणे हा ऑस्ट्रेलियाला मोठ धक्का मानला जात आहे. यामुळे कांगारूंना ॲशेस मालिका जिंकण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. ऑस्ट्रेलियाने २०१८ पासून ॲशेस चषकावर आपला ताबा ठेवला आहे, परंतु यावेळी इंग्लंडविरुद्धचे आव्हान अधिक कठीण मानले जात आहे.
गेल्या महिन्यात कमिन्सने सांगितले होते की, तो किमान मालिकेपूर्वी एक महिना किंवा सहा आठवड्यांपूर्वी गोलंदाजी सुरू करू इच्छितो. सध्या तो धावणे आणि गोलंदाजी करण्यापासून पूर्णपणे दूर आहे. तो हळूहळू रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करत आहे.
ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी नुकतेच news.com.au ला सांगितले की, पॅट कमिन्सने ॲशेस मालिकेत मैदानात उरण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे, भलेही यासाठी त्याला ॲशेसचे काही कसोटी सामने गमवावे लागले तरी चालेल. तुमचा मुख्य वेगवान गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार, कोणताही क्रिकेटचा सामना चुकवावा, असे कुणालाच वाटणार नाही.’
ब्रेट लीने स्पष्ट केले, 'कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत त्याची वाट पाहणे अधिक चांगले आहे, कारण पहिल्या कसोटीत ते ९० किंवा ८० टक्के तंदुरुस्त असताना त्याला खेळवायचे नाही. जर त्याच्या पाठीला पुन्हा दुखापत झाली, तर तो संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत जायबंदी राहिल आणि मैदानाबाहेर बसण्याची नामुष्की ओढवेल.’