मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघात दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
पाच कसोटी सामन्यांच्या ‘ॲशेस’ मालिकेत पहिले तिन्ही सामने गमावल्यामुळे इंग्लंडने आधीच ही ट्रॉफी गमावली आहे. अशातच, इंग्लिश खेळाडू 'मद्यपान प्रकरणा'त अडकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिले आहेत. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
२६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी पाहुण्या संघाने आपली कंबर कसली आहे. ॲडलेडमधील तिसऱ्या कसोटीत ८२ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) दृष्टीने उर्वरित १२ गुण मिळवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
या सामन्यासाठी डावखुरा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल याचे संघात आगमन झाले असून त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन याने संघात पुनरागमन केले आहे. जोफ्रा आर्चरला स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकावे लागल्याने ॲटकिन्सनला स्थान मिळाले आहे. खराब फॉर्मचा फटका बसलेल्या ओली पोप याला संघातून वगळण्यात आले आहे.
मालिकेतील शेवटचे दोन सामने जिंकून उरलीसुरली प्रतिष्ठा राखण्याचे इंग्लंडसमोर आव्हान आहे. मात्र, सलग तीन पराभव आणि खेळाडूंच्या वर्तणुकीमुळे संघावर टीकेची झोड उठत आहे. एका अहवालानुसार, ब्रिस्बेन कसोटीतील पराभवानंतर इंग्लिश खेळाडूंनी सलग सहा दिवस मद्यपान केले होते. ‘नूसा’ या गावात सुट्ट्यांचा आनंद घेताना खेळाडूंनी केलेल्या पार्ट्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये खेळाडू मद्याच्या नशेत असल्याचे दिसत असून यामुळे इंग्लंड क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
झॅक क्रॉली, बेन डकेट, जॅकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोश टंग.