२०१५ पासून इंग्लंड क्रिकेट संघाने अॅशेस मालिका जिंकलेली नाही.
यंदा पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर, इंग्लिश संघ सराव करण्याऐवजी समुद्रकिनाऱ्यावर पार्टी करण्यात गुंग होत.
इंग्लिश खेळाडूंनी सलग ६ दिवस जंगी पार्टी केल्याचा दावा केला जात आहे.
सिडनी : जगप्रसिद्ध ‘ॲशेस' मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ११ दिवसांत गुडघे टेकणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाच्या गोटातील एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गमावण्यापूर्वी इंग्लंडचे काही खेळाडू सलग सहा दिवस मद्यपानात आणि पार्ट्यांमध्ये मग्न होते, असा खळबळजनक दावा 'बीबीसी'च्या वृत्तात करण्यात आला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्याचे वर्णन क्रिकेट तज्ज्ञांनी चक्क 'ग्लोरिफाईड स्टॅग डू' (एखाद्या लग्नाआधीची बॅचलर पार्टी) असे केले आहे.
‘बीबीसी स्पोर्ट’च्या अहवालानुसार, ब्रिस्बेनमधील दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडच्या संघाला ॲडलेड कसोटीपूर्वी नऊ दिवसांची विश्रांती मिळाली होती. या काळात संघाने सराव करणे अपेक्षित असताना, खेळाडू क्वीन्सलँडमधील ‘नूसा’ या पर्यटनस्थळी सुट्ट्या घालवण्यासाठी गेले. वृत्तानुसार, काही खेळाडूंनी ब्रिस्बेनमध्ये दोन दिवस आणि त्यानंतर नूसा येथे चार दिवस, असा सलग सहा दिवस मद्यपानाचा कार्यक्रम आखला होता. 'डेली मेल'ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये हॅरी ब्रूक आणि वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स समुद्रकिनाऱ्यावरील एका प्रसिद्ध बारमध्ये बीअरचा आनंद घेताना स्पष्टपणे दिसत आहेत.
पण, जे खेळाडू कुटुंबासह आले होते, ते या सर्व गोष्टींपासून अलिप्त दिसले, ज्यात जो रूटचा समावेश होता.
नूसा येथील सुट्ट्यांदरम्यान खेळाडूंचे पूर्ण लक्ष केवळ समुद्रकिनारी पार्टी करण्यावर होते. यादरम्यान त्यांना सरावाबाबत कमालीची उदासीनता दिसून आली. स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पीट सिम यांनी सकाळी ७:४५ वाजता खेळाडूंना सराव आणि व्यायामासाठी बोलावले होते, तेव्हा संपूर्ण संघापैकी केवळ तीनच खेळाडू उपस्थित राहिले. यामध्ये जेमी स्मिथ, शोएब बशीर आणि जॉश टंग यांचा समावेश होता.
इंग्लंडच्या या दौऱ्याची सुरुवातच वादाने झाली होती. न्यूझीलंडचा दौरा आटोपून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या इंग्लंडने मुख्य सामन्यापूर्वी केवळ एक सराव सामना खेळला, तोही स्वतःच्याच ‘अ-संघा’विरुद्ध. यावर भाष्य करताना महान क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी इंग्लंडची ही वृत्ती ‘अहंकारी’ असल्याचे म्हटले होते. त्यावर कर्णधार बेन स्टोक्सने ‘ही टीका केवळ विस्मृतीत गेलेल्या माजी खेळाडूंकडून होत आहे,’ असा खोचक टोला मारून वाद ओढवून घेतला होता.
एकीकडे खेळाडू पार्ट्यांमध्ये दंग असताना, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी पराभवाचे खापर चक्क ‘अतिरिक्त तयारी’वर फोडले आहे. मॅक्युलम म्हणाले, ‘कदाचित आम्ही सरावावर जास्त भर दिला. प्रशिक्षक म्हणून मला हे समजायला हवे होते की कधीकधी ताजेतवाने राहणे अधिक महत्त्वाचे असते.’ विशेष म्हणजे, फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी एका पत्रकार परिषदेत कबूल केले की, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळताना होणाऱ्या चुकांबाबत संघात साधी चर्चाही झाली नव्हती.
मालिकेत सपशेल शरणागती पत्करल्यानंतरही खेळाडूंच्या विधानांमध्ये ताळमेळ दिसत नाहीये. एकीकडे बेन स्टोक्स म्हणतो की, ‘ऑस्ट्रेलिया ही कमकुवत लोकांसाठी जागा नाही,’ तर दुसरीकडे जॅक क्रॉलीसारखे खेळाडू ३-२ असा पराभव झाला तरी तो विजयच मानू, अशी हास्यास्पद विधाने करत आहेत.
अशा तर्कहीन विधानांच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ मैदानावर ऑस्ट्रेलियाला साधी झुंजही देऊ शकला नाही. विशेष म्हणजे, यजमान ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांसारख्या प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही इंग्लंडवर वर्चस्व गाजवले.
मालिकेतील पहिले दोन सामने अवघ्या सहा दिवसांत आटोपले आणि त्यानंतर खेळाडूंनी तितकेच दिवस मद्यपानात घालवले, ही बाब इंग्लिश चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. सरावाऐवजी गोल्फ खेळणे आणि कॅनबेरा येथील महत्त्वाचा सराव सामना नाकारणे यांसारख्या चुका आता इंग्लंडच्या अंगलट आल्या आहेत.
इंग्लंडने शेवटची ॲशेस मालिका २०१५ मध्ये जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळलेल्या १८ कसोटींपैकी १६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियात सलग विजय न मिळवण्याची कोणत्याही संघाची ही आतापर्यंतची सर्वात लाजिरवाणी कामगिरी ठरली आहे. या मानहानीकारक पराभवानंतर आता इंग्लिश संघातील अनेक अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत.