अल ऐन : भारताची उदयोन्मुख रेसिंग सेन्सेशन अतिका मीर हिने आंतरराष्ट्रीय कार्टिंग मालिकेत जागतिक दर्जाच्या पुरुष ड्रायव्हर्सना मागे टाकून पात्रता फेरीत चौथे स्थान पटकावले. या चॅम्पियनशिपच्या इतिहासात कोणत्याही महिला रेसरने मिळवलेले हे सर्वात मोठे यश आहे. फॉर्म्युला वन अकादमी आणि अक्सल जीपीच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या 11 वर्षांच्या जम्मू-काश्मीरच्या प्रतिभावान अतिका मीरने आपल्या रेसिंगच्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. कामगिरीची ठळक
पहिल्या दिवशी पात्रता फेरीत मिनी गटात अतिकाने चौथे स्थान मिळवले, जो एका महिलेसाठी या मालिकेतील विक्रमी उच्चांक आहे. अंतिम फेरीत अतिकाने चौथ्या स्थानावर रेस पूर्ण केली. पॉडियम फिनिश (पहिले तीन स्थान) केवळ 0.07 सेकंदांनी हुकला. दुसऱ्या दिवशी पात्रता फेरीत अतिकाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करत पाचवी सर्वात जलद वेळ नोंदवली. अंतिम फेरीत ती शर्यतीच्या बहुतेक भागांमध्ये पोडियमच्या शर्यतीत होती. शेवटच्या लॅपमध्ये धाडसी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिने तिसरे स्थान गमावले, तरीही तिने 28 ड्रायव्हर्सपैकी सन्माननीय सातवे स्थान मिळवले.
शर्यतीनंतर अतिका मीर म्हणाली, या आठवड्यात जगातील अव्वल ड्रायव्हर्ससोबत काही कठीण शर्यती झाल्या. दोन्ही दिवस माझा चांगला वेग होता आणि मी पात्रता फेरीत तसेच फायनलमध्ये अपेक्षित निकाल देऊ शकले. चॅम्पियनशिपचे चांगले गुण मिळाले आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या सिझन फायनलसाठी मी उत्सुक आहे. मालिकेचा सिझन फायनल पुढील आठवड्यात अल फुरसान येथे होणार आहे.
अतिकाचे वडील, आसिफ मीर (माजी फॉर्म्युला एशिया उपविजेता), यांनीही तिच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, या आठवड्यात अतिकाची कामगिरी उत्कृष्ट होती. तिने जगातील सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर्सच्या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आणि त्यांना हरवलेदेखील. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून घेत असलेल्या कठोर परिश्रमाचे हे प्रोत्साहन आणि फळ आहे.