पुढारी ऑनलाईन डेस्क : गुवाहाटी हे आसाममधील सर्वात मोठी शहर. येथील गुवाहाटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर येत्या नोव्हेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील गुवाहाटी हे पहिले कसोटी क्रिकेटचे ठिकाण ठरणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सरचिटणीस देवजित सैकिया यांनी दिली.
यंदाच्या आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप दरम्यान गुवाहाटीला पहिल्यांदाच वर्ल्ड कप सामन्यांचे यजमानपद मिळणार आहे. "गुवाहाटीमध्ये आतापर्यंत कसोटी किंवा वर्ल्ड कप सामने झालेले नाहीत. मात्र, शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, यावर्षी हे दोन्ही सामने गुवाहाटीमध्ये खेळवले जातील," असे सैकिया यांनी सांगितले.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून आसाम क्रिकेट असोसिएशन (ACA) स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तसेच, गुवाहाटीमध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपचे पाच ते सहा सामने होणार आहेत. हे ईशान्य भारतातील पहिले वर्ल्ड कप क्रिकेट सामने असतील. "महिला वर्ल्ड कप २४ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होणार असून त्याचे वेळापत्रक अंतिम टप्प्यात आहे. गुवाहाटीला यजमानपद देण्याचा निर्णय घेतला गेला आहे," असे सैकिया म्हणाले. त्यांनी आयसीसी अध्यक्ष जय शाह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे आभार मानले आणि गुवाहाटी क्रिकेटसाठी एक प्रमुख स्थळ म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले.
गुवाहाटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा इतिहास समृद्ध आणि उल्लेखनीय आहे. हे स्टेडियम आसाम क्रिकेट असोसिएशन (ACA)च्या अधिपत्याखाली असून, ईशान्य भारतातील क्रिकेटसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियम, ज्याला आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते, हे आसाममधील एक प्रमुख क्रिकेट मैदान आहे. या स्टेडियमची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली असून, ते राज्यातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलांपैकी एक आहे. हे स्टेडियम सुमारे ४०,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले असून, येथे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. या मैदानाच्या दोन प्रमुख टोकांना ‘मीडिया एंड’ आणि ‘पॅव्हेलियन एंड’ अशी नावे देण्यात आली आहेत.स्टेडियममध्ये २०१७ मध्ये आधुनिक फ्लडलाईट्स बसवण्यात आल्या, ज्यामुळे येथे दिवस-रात्र सामने खेळवण्याची सुविधा उपलब्ध झाली. हे मैदान आसाम क्रिकेट संघाचे अधिकृत घरचे मैदान असून, क्रिकेट क्षेत्रात राज्याची ओळख निर्माण करण्यात या स्टेडियमचा मोठा वाटा आहे. आता, २०२५ मध्ये गुवाहाटी येथे पहिल्यांदाच कसोटी सामना आणि महिला वनडे वर्ल्ड कपच्या सामन्यांचे आयोजन होणार असल्याने हे मैदान अधिक प्रतिष्ठित ठरणार आहे.