कराची : वृत्तसंस्था
'पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद असिफ हा माझ्या पायांना चांगला मसाज करायचा,' असा खळबळजनक खुलासा पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने केला आहे. मोहम्मद आसिफ आणि वीणा मलिक यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. वीणा मलिकने भारतातील टीव्ही शो 'बिग बॉस'मध्येही सहभाग घेतला होता आणि बोल्ड अंदाजामुळे ती नेहमी चर्चेत असते. आता तिने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. तिने एका मुलाखतीत मोहम्मद असिफ तिच्या पायांचा मसाज करायचा, असा दावा केला आहे.
'असिफ क्रिकेट खेळण्यापेक्षा चांगल्या प्रकारे मसाज करायचा,' असेही ती म्हणाली. वीणा मलिकने सांगितले की, 'क्रिकेटपेक्षा असिफ पायांचा मसाज करण्यात अधिक तरबेज होता. माझ्यासाठी तोच खरा पुरुष होता. तो माझ्या पायांची मसाज करायचा आणि ते क्षण मी विसरू शकत नाही. तेव्हा मला अनेकदा वाटायचे की तो क्रिकेटपटूपेक्षा चांगला फूट मसाजर झाला असता.' 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद असिफचे नाव समोर आल्यानंतर वीणा मलिकने त्यांच्याशी ब्रेक अप केले.
2010 मध्ये इंग्लंड दौर्यावरील कसोटी मालिकेत असिफ तत्कालीन कर्णधार सलमान बट आणि मोहम्मद आमीर हे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. लॉर्डस्वर झालेल्या सामन्यात तीनही क्रिकेटपटूंवर सट्टेबाज मझहर माजिद याच्यासह मिळून स्पॉट फिक्सिंग करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यूज ऑफ वर्ल्डने स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण समोर आणले होते. या सामन्यापूर्वी 'नो बॉल' केव्हा फेकले जातील हे ठरले होते आणि त्यासाठी खेळाडूंना भरपूर रक्कम दिली गेली होती. सलमान बट, आमीर व असिफ यांना 2011 मध्ये आयसीसीने 5 वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावली होती.