नागोया-जपान : वृत्तसंस्था
येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा खेळांमध्ये गुरुवारी भारताच्या पॅरा अॅथलिट्सची नेत्रदीपक कामगिरी कायम राहिली. भारताने या स्पर्धेच्या चौथ्या दिवसअखेर २१ सुवर्ण, २६ रौप्य व ४१ कांस्य अशी एकूण ८८ पदके नोंदवली.
दिवसाच्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या ४०० मीटर टी ४७ प्रकारात दिलीप गावितने सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी १०० मीटर टी ४७ शर्यतीत सुवर्ण जिंकणाऱ्या दिलीपने ४८.२७ सेकंदांची वेळ नोंदवत जपानमधील आपल्या दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले. यासह त्याने २०२३ हँग्डा स्पर्धेतील विजेतेपदही यशस्वीरीत्या राखले. दिवसाचा समारोपही भारताने सुवर्णपदकानेच केला.
पुरुषांच्या लांब उडी टी ४४/टी ६२/टी ६४ अंतिम फेरीत सोलाईराज धर्मराजने आशियाई क्रीडा स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावून आपले जेतेपद कायम राखले. सोलाईराजने ७.१५ मीटर झेप घेतली, तर मलेशियाच्या एडी बर्नार्डने ६.३४ मीटरसह रौप्य आणि युमा तामाकीने (टी ६४) ६.८९ मीटरसह कांस्यपदक जिंकले.
पॅरा जलतरणात रवी कार्तिक बुदीगीनाने दोन रौप्यपदकांनंतर आणखी एका कांस्यपदकाची भर घातली. पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल एस १३ प्रकारात त्याने २५.८९ सेकंद वेळेसह तिसरे स्थान मिळवले; तो केवळ ०.३८ सेकंदांच्या फरकाने रौप्यपदकापासून वंचित राहिला. इंडोनेशियाच्या यावियांदा मौलानाने रौप्यपदकावर आपली मोहर उमटवली. पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक एस ७ फेरीत तेजस नंदकुमारने १:१८.५८ अशा वेळेसह कांस्यपदक मिळवले.
शैलेश कुमारला सुवर्ण; तिन्ही पदकांवर भारताचा कब्जा
पुरुषांच्या उंच उड़ी टी ६३ प्रकारात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सर्व तिन्ही पदकांवर कब्जा केला. शैलेश कुमारने १.८९ मीटर उडी मारत नवा आशियाई विक्रम रचून सुवर्णपदक जिंकले. वरुण भाटीने हंगामातील सर्वोत्तम १.८४ मीटर कामगिरीसह रौप्य, तर राहुलने वैयक्तिक सर्वोत्तम १.८१ मीटर उडी मारत कांस्यपदक मिळवले. महिलांच्या ४०० मीटर टी ४७ फेरीतही भारताने दुहेरी यश मिळवले; अंजनाबेन बुंबडियाने ५९.९७ सेकंदांच्या वेळेसह सुवर्ण, तर जयंती बेहेराने १:००.६५ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले, महिलांच्या ४०० मीटर टी १२ अंतिम फेरीत तेजलबेन डामोरने ५७.६० सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळवले. या शर्यतीत इराणच्या हजार सफारझादेहने ५६.४३ सेकंदांच्या नव्या आशियाई विक्रमासह सुवर्ण पटकावले.
कपिल कुमारला रौप्य
जलतरणात कपिल कुमारने पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल एस १० प्रकारात ४:३८.४४ वेळेसह रौप्यपदक पटकावले. जपानच्या अकिटो मिनाईने ४:२७.४४ सेकंदांसह सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या ब्रेस्टस्ट्रोक एसबी ९ अंतिम फेरीत स्वस्तिक पाटीलने १:१३.७७ वेळेसह भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
पॅरा बॅडमिंटनमध्ये महिला एकेरी एसयू ५ च्या उपांत्य फेरीत मनीषा रामदासला सहकारी खेळाडू तुलसीमाथी मुरुगेसनकडून २१-१९, १५-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरीत सूर्यकांत यादव आणि नवीन शिवकुमार जोडीला इंडोनेशियाच्या सुर्यो नुग्रोहो आणि मुह अल इप्तान जोडीविरुद्ध १-२ (८-२१, २१- १९ १६-२१) अशा पराभवानंतर करियपटक मिळाले.