स्पोर्ट्स

Asian Para Games : भारताचे पदकांचे खाते उघडले! १० मीटर रायफल प्रकारात मोनाचा सुवर्णवेध, अवनीची रौप्य कामगिरी

मोनाला वयाच्या नवव्या महिन्यात पोलिओ

रणजित गायकवाड

नागोया (जपान) : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पदकांचे खाते अतिशय धडाकेबाज पद्धतीने उघडले आहे. सोमवारी (१९ ऑक्टोबर) झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खात्यात एकदम दोन पदकांची भर पडली. महिलांच्या १० मीटर एअर रायफल ‘एसएच१’ प्रकारात भारताची स्टार नेमबाज मोना अगरवाल हिने अचूक वेध घेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर तिची सहकारी खेळाडू आणि दोन वेळची पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिने याच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले.

२५०.० गुणांचा नवा विक्रम

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक विजेती ठरलेल्या मोना अगरवाल हिने नागोया येथील अंतिम फेरीत २५०.० गुणांचा नवा विक्रम रचत अव्वल स्थान पटकावले. तिने अवनी लेखराला केवळ ०.४ गुणांच्या फरकाने मागे टाकले. अवनीने २४९.६ गुणांची नोंद करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. अंतिम फेरीचा हा सामना शेवटपर्यंत कमालीचा चुरशीचा ठरला. अखेरच्या शॉट्सपूर्वी मोनाकडे २३९.२ गुणांसह अवनीवर अवघ्या ०.१ गुणांची निसटती आघाडी होती; मात्र मोनाने शेवटपर्यंत संयम राखत सुवर्णपदक निश्चित केले. याच प्रकारात दक्षिण कोरियाच्या युनरी ली हिने कांस्यपदक मिळवले. उल्लेखनीय म्हणजे, ‘एसएच१’ ही वर्गवारी शरीराच्या खालच्या भागामध्ये अपंगत्व असणाऱ्या नेमबाजांसाठी राखीव असते.

मोनाला वयाच्या नवव्या महिन्यात पोलिओ

सुवर्णपदक विजेती मोना अगरवाल ही मूळची राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी आहे. ८ नोव्हेंबर १९८७ रोजी जन्मलेल्या मोनाला वयाच्या नवव्या महिन्यात पोलिओची लागण झाली आणि तिच्या दोन्ही पायांवर गंभीर परिणाम झाला. मात्र, या परिस्थितीसमोर न झुकता तिने क्रीडा क्षेत्रात पदार्पण केले. पॅरा नेमबाजीत येण्यापूर्वी ती पॅरा ॲथलेटिक्स आणि पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सहभागी होत होती. तिने महिलांच्या सिटिंग व्हॉलीबॉल खेळातही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, २०१९ मधील पहिल्या राष्ट्रीय सिटिंग व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत राजस्थानच्या महिला संघाचे कर्णधारपद भूषवत तिने संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

डिसेंबर २०२१ मध्ये मोनाने रायफल नेमबाजीत अधिकृतरीत्या पाऊल ठेवले. २०२२ मध्ये राष्ट्रीय रौप्यपदक जिंकल्यानंतर तिने क्रोएशियातील ओसिजेक येथे झालेल्या २०२३ च्या वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट विश्वचषक स्पर्धेतील मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. त्यानंतर २०२३ मध्ये दक्षिण कोरियातील चांगवोन येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ प्रकारात सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली होती.

दुसरीकडे, रौप्यपदक विजेती अवनी लेखरा हिचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. २०१२ मध्ये वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी झालेल्या भीषण कार अपघातात तिच्या मणक्याला (स्पाइनल कॉर्ड) गंभीर दुखापत झाली. या मोठ्या आघातातून सावरत असताना तिच्या वडिलांनी तिला क्रीडा क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्या 'अ शॉट ॲट हिस्ट्री' या आत्मचरित्राने प्रेरित होऊन अवनीने २०१५ मध्ये नेमबाजीचा सराव सुरू केला. क्रीडा क्षेत्रातील कठोर सराव आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सांभाळत तिने राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पाच वर्षांची पदवी (लॉ डिग्री) यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT