स्पोर्ट्स

India Hockey Team Gold Medal : गोल्डन गर्ल्स! भारताच्या लेकींनी 44 वर्षांनी जिंकले सुवर्णपदक, Asian Games च्या अंतिम सामन्यात चीनचा पराभव

Asian Games 2026 : २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के

रणजित गायकवाड

Asian Games 2026 India Women's Hockey Team Gold Medal : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण अक्षरांनी इतिहास रचला आहे. अत्यंत चुरशीच्या आणि श्वास रोखून धरणाऱ्या अंतिम लढतीत भारतीय महिलांनी यजमान चीनचा १-० असा पराभव करत मानाच्या सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले. लालरेमसियामीने नोंदवलेला अफलातून गोल आणि अनुभवी गोलकीपर सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील अभेद्य बचावाच्या जोरावर भारताने हे ऐतिहासिक यश संपादन केले.

या सुवर्ण विजयासोबतच भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (LA 2028 Olympics) थेट पात्रता मिळवली आहे.

लालरेमसियामीचा २०० व्या सामन्यात अविस्मरणीय 'सुवर्ण' गोल

आपला २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या लालरेमसियामीसाठी हा सामना अत्यंत संस्मरणीय ठरला. पहिल्या क्वार्टरमध्ये दहाव्या मिनिटाला साक्षीने दिलेल्या सुरेख पासवर लालरेमसियामीने अप्रतिम वळसा घेत जोरदार 'टोमाहॉक' रिव्हर्स फटका मारला. चेंडू थेट चीनच्या गोलजाळ्यात विसावला आणि भारताने १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. भारताचे माजी कर्णधार वीरेन रासकिन्हा यांनी या गोलचे कौतुक करताना "हा स्पर्धेतील सर्वोत्तम गोल ठरेल," अशा शब्दांत गौरव केला, तर माजी गोलकीपर पी. आर. श्रीजेशनेही या आक्रमक सुरुवातीचे जोरदार कौतुक केले.

सविता पुनियाची 'ग्रेट वॉल' आणि गोल-लाइन बचाव

एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर चीनने भारतीय गोलपोस्टवर एकापाठोपाठ एक जोरदार हल्ले चढवले. मात्र, भारतीय बचाव फळी भिंतीसारखी उभी राहिली.

२२ वे मिनिट : चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मात्र, भारताची 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सविता पुनियाने डाव्या बाजूला अचूक सूर मारत झांग यिंगचा पेनल्टी स्ट्रोक अडवला आणि भारताची आघाडी कायम ठेवली.

बचावफळीची कमाल : नवनीत कौरने गोल-लाइनवरून चेंडू बाहेर काढत दोन वेळा निश्चित गोल रोखले. शिल्पी डबास आणि अनुभवी सुशीला चानू यांनी चिनी आक्रमकांना सातत्याने अपयशी ठरवले.

अखेरच्या मिनिटांत हाय-व्होल्टेज थरार

तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार सलिमा टेटे दुखापतग्रस्त झाल्याने काही काळ मैदानाबाहेर गेली, त्यामुळे भारतावर दबाव वाढला. मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये सलिमाने पुन्हा मैदानात उतरून भारतीय खेळाडूंमध्ये नवा उत्साह भरला.

सामन्याच्या अखेरच्या ५७ व्या मिनिटाला चीनने गोलकीपर लिऊ पिंगला मैदानाबाहेर काढत अतिरिक्त आक्रमक खेळाडू उतरवून बरोबरी साधण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. ५८ व्या मिनिटाला सलिमा टेटेने प्रतिहल्ल्यात आघाडी घेत चीनच्या रिकाम्या गोलपोस्टवर चढाई केली, तर दुसऱ्या टोकाला सविताने पुन्हा एकदा हात लावून चीनचा अखेरचा प्रयत्न हाणून पाडला. बलजीत आणि लालरेमसियामीने अखेरच्या सेकंदांमध्ये चेंडूवर ताबा मिळवत उत्कृष्ट वेळेचे नियोजन केले आणि अंतिम हूटर वाजताच भारतीय गोटात सुवर्ण जल्लोष सुरू झाला.

भारताच्या या ऐतिहासिक सुवर्ण विजयाने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT