राजगीर; वृत्तसंस्था : अलीकडच्या काळातील निराशाजनक कामगिरीला मागे सारून विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित करण्याच्या निर्धाराने तीन वेळचा विजेता भारतीय संघ पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेत उतरणार आहे. शुक्रवारी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारतासमोर तुलनेने दुबळ्या, पण तितक्याच चपळ चीन संघाचे आव्हान असेल.
भारत आणि चीनला जपान आणि कझाकिस्तानसोबत ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. तर ‘ब’ गटामध्ये गतविजेता आणि पाच वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगला देश आणि चायनीज तैपेई यांचा समावेश आहे. पाकिस्तान आणि ओमानने स्पर्धेतून माघार घेतल्याने तीन दशकांनंतर प्रथमच आशिया चषक खेळणारा कझाकिस्तान आणि बांगला देश यांना संधी मिळाली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, तर अंतिम सामना 7 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. बेल्जियम आणि नेदरलँडस्मध्ये पुढील वर्षी 14 ते 30 ऑगस्टदरम्यान होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची भारतासाठी ही सर्वोत्तम आणि अखेरची संधी आहे.
एफआयएच प्रो-लीगच्या युरोपियन टप्प्यात झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत भारताला आठ सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला आणि संघाच्या इतिहासातील सर्वात मोठी सलग सात सामन्यांतील पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. यामुळे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांना आशिया चषकासाठी पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवणे भाग पडले आहे.
शुक्रवारच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी असलेल्या चीनविरुद्ध भारतच प्रबळ दावेदार मानला जात आहे. चिनी संघ प्रामुख्याने प्रतिआक्रमणावर अवलंबून असतो. 2009 मध्ये कांस्यपदक जिंकणे ही त्यांची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. असे असले, तरी भारताला चीनला कमी लेखून चालणार नाही आणि त्यांच्या वेगवान आक्रमणांना तोंड देण्यासाठी बचावफळीला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
आशियाई संघांविरुद्ध भारताची अलीकडची कामगिरी प्रभावी राहिली आहे. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि 2024 च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने 14 सामन्यांत 94 गोल केले आहेत. मात्र, 2022 च्या आशिया चषकातील कांस्यपदक हे आठवण करून देते की, सर्वोत्तम कामगिरीनंतरही संघ गाफील राहू शकत नाही.
बचावफळी : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील बचावफळीला या स्पर्धेत कोणतीही चूक करून चालणार नाही.
पेनल्टी कॉर्नर : संघ मोठ्या प्रमाणावर हरमनप्रीतवर अवलंबून आहे. त्याच्या अनुपस्थितीत अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि संजय यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
गोलरक्षण : पी. आर. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्यावर गोलरक्षणाची जबाबदारी आहे. मात्र, दोघांनाही दबावाखाली संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले आहे.
गोलरक्षक : कृष्ण बी. पाठक, सूरज करकेरा
बचावफळी : सुमित, जर्मनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग
मध्यरक्षक : राजिंदर सिंग, राज कुमार पाल, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद
आघाडीची फळी : मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजित सिंग, दिलप्रीत सिंग
सामन्याची वेळ : दुपारी 3 वाजता.