कोलंबो : वृत्तसंस्था भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कप 2023 चा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सुपर-4 फेरीत गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महिश तिक्षणा जखमी झाला. या सामन्याच्या 34 व्या षटकात तो जखमी झाला. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि फिजिओकडून वैद्यकीय उपचार घेतले. यानंतर तो मैदानात परतला आणि गोलंदाजीही केली. परंतु, अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळणे त्याच्यासाठी थोडे कठीण असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंकन बोर्डाने आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आणि सांगितले की, तिक्षणा याच्या उजव्या हाताला ताण आला आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तिक्षणाला ही दुखापत झाली. श्रीलंकेच्या संघाला यावर्षी होणार्या एकदिवसीय वर्ल्डकपलाही सहभागी व्हायचे आहे. अशा स्थितीत टीम इंडियाविरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यात तिक्षणाला विश्रांती दिली जाऊ शकते. तिक्षणा हा श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने यावर्षी 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 च्या सरासरीने एकूण 31 विकेटस् घेतल्या आहेत आणि श्रीलंकेसाठी विश्वचषक मोहिमेसाठी तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे. सर्व संघांना 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपचा अंतिम संघ 'आयसीसी'कडे सादर करायचा आहे.