राजगीर; वृत्तसंस्था : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या सामन्यात भारताने कझाकिस्तानचा 15-0 अशा मोठ्या फरकाने पराभव करत सुपर-4 फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत प्रत्येक चार मिनिटांत एक गोल नोंदवला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान पटकावले.
भारताकडून अभिषेकने सर्वाधिक चार गोल (5, 8, 20, 59 व्या मिनिटाला) केले. सुखजित सिंग (15, 32, 38 व्या मिनिटाला) आणि जुगराज सिंग (24, 31, 47 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी तीन गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. कर्णधार हरमनप्रीत सिंग (26 व्या मिनिटाला), अमित रोहिदास (29 व्या मिनिटाला), राजिंदर सिंग (32 व्या मिनिटाला), संजय (54 व्या मिनिटाला) आणि दिलप्रीत सिंग (55 व्या मिनिटाला) यांनीही प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. चीन आणि जपानचा पराभव केल्यानंतर भारताचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे.
‘अ’ गटातून भारतासह चीनने सुपर-4 फेरी गाठली आहे, तर ‘ब’ गटातून मलेशिया आणि कोरियाने पुढच्या टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे. सुपर-4 मध्ये हे चारही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि त्यापैकी अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना रविवारी होणार आहे. यापूर्वी, याच गटातील अन्य एका सामन्यात जपान आणि चीन यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे गोलफरकाच्या आधारे चीनने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला.
सामन्याच्या पाचव्या मिनिटाला अभिषेकने पहिला गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनी त्याने दुसरा गोल केला.
भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीतचा फटका कझाकिस्तानच्या गोलरक्षकाने वाचवला. मात्र, अभिषेकच्या पासवर सुखजितने गोल करत भारताची आघाडी वाढवली.
कझाकिस्तानला मिळालेल्या दोन्ही पेनल्टी कॉर्नरवर त्यांना गोल करण्यात अपयश आले.
अभिषेकने 20 व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.
जुगराज सिंगनेही पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.
शेवटच्या क्वार्टरमध्ये संजयने पेनल्टी कॉर्नरवर, तर दिलप्रीत सिंगने मैदानी गोल केला.
सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला अभिषेकने आपला चौथा गोल करत कझाकिस्तानचा पूर्णपणे धुव्वा उडवला.