हॉकी आशिया कप स्पर्धेचा शुक्रवारी (दि.२९) बिहारमधील राजगीर येथे शानदार प्रारंभ झाला. राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यजमान भारतीय हॉकी संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात चीनचा ४-३ असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने तीन गोल डागले आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्याव्यतिरिक्त, जुगराज सिंगने एक गोल केला.
दुसरीकडे, चीनकडून चेन बेनहाई, गाओ जियेशेंग आणि डू शिहाओ यांनी प्रत्येकी एक गोल केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यात अपुरा ठरला. भारतीय संघाने या विजयासह स्पर्धेतील आपली दावेदारी मजबूत केली आहे.
हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न करत शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. भारताने सामन्याची चांगली सुरुवात केली. चेंडू गोलपोस्टच्या आत पोहोचवला होता, पण मॅच रेफरीने तिसऱ्या पंचाचा सल्ला घेऊन तो फाऊल ठरवला. त्यानंतर चीनने पुनरागमन करत पहिला गोल केला आणि १-० अशी आघाडी घेतली. डू शिहाओने ड्रॅग फ्लिकवर हा गोल केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि अर्ध्या वेळेपर्यंत २-१ अशी आघाडी घेतली. यावेळी हरमनप्रीत आणि जुगराज यांनी ड्रॅग फ्लिकवर प्रत्येकी एक गोल केला.
तिस-या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी ३-१ पर्यंत पोहचवली. पण त्यानंतर चीनने शानदार पुनरागमन केले. त्यांनी भारतीय बचाव फळीवर सतत दबाव ठेवला. त्यांच्या खेळाडूंनी प्रतिहल्ल्यांदरम्यान उत्कृष्ट ड्रिब्लिंगचे प्रदर्शन केले आणि दोन गोल डागले. यासह ३-३ अशी बरोबरी साधली. भारताकडून या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंहने एक गोल केला, तर चीनकडून चेन बेनहाई आणि गाओ जियेशेंग यांनी गोल केले.
शेवटच्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. त्याने ड्रॅग फ्लिकवर स्वतःचा तिसरा आणि भारतासाठी चौथा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांकडून कोणताही गोल होऊ शकला नाही. भारतीय बचावपटूंनी उत्कृष्ट खेळ करत चीनचे प्रतिहल्ले यशस्वीपणे थोपवले आणि भारताचा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, या सामन्यातील सर्व सात गोल ड्रॅग फ्लिक द्वारे झाले.
भारत, चीन, जपान आणि कझाकस्तान हे संघ ग्रुप 'ए' मध्ये आहेत. तर, पाच वेळा विजेतेपद पटकावलेला दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चीनी तैपेई यांचा ग्रुप 'बी' मध्ये समावेश आहे.