मुंबई : संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार्या आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवड समिती मुंबईत बैठक घेणार असून, मुख्य खेळाडूंच्या फिटनेस अहवालावरच अंतिम संघ निवड अवलंबून असणार आहे.
9 ते 28 सप्टेंबरदरम्यान होणार्या या टी-20 स्वरूपाच्या स्पर्धेसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या फिटनेस चाचणी देत आहे. त्याच्या अहवालानंतरच निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
दुसरीकडे, स्पोर्टस् हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत असलेला कर्णधार सूर्यकुमार यादव सरावाला लागला असून, तो स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. या निवडीमध्ये नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
इंग्लंड दौर्यातील चमकदार कामगिरीनंतर शुभमन गिलच्या नावाची उपकर्णधारपदासाठी चर्चा सुरू आहे. तसेच, मधल्या फळीतील स्थानांसाठी संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धा असेल, असे संकेत आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, निवड समितीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल आणि त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात, म्हणजेच २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू होईल. या पार्श्वभूमीवर, जैस्वाल (आयपीएल २०२५ मध्ये ५५९ धावा, १६० स्ट्राइक रेट), गिल (६५० धावा, १५५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेट) आणि ऑरेंज कॅप विजेता साई सुदर्शन (७५९ धावा, १५६ स्ट्राइक रेट) यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होत आहे.