भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी संघाची आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून ज्या प्रकारे नाचक्की झाली आहे, त्यानंतर त्यांची अवस्था वाईट झाली आहे. या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन न करता त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाकिस्तानी संघाच्या या निराशाजनक कामगिरीवर प्रत्येकाकडे काही ना काही सांगण्यासारखे आहे, अशातच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एक वक्तव्य करून पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे,. त्यांनी पाक संघाचा ‘पोपटवाडी टीम’ असा उल्लेख करून जबरदस्त टोला लगावला आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आशिया चषकाचे प्रक्षेपण करणाऱ्या सोनी टीव्ही वाहिनीवर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. गावस्कर म्हणाले की, ‘मी हनीफ मोहम्मद यांच्या काळापासून, म्हणजे १९६० पासून, पाकिस्तानी क्रिकेट आणि त्यांच्या संघाला फॉलो करत आलो आहे. चर्चगेटहून ब्रेबॉर्न स्टेडियमवर हनीफ मोहम्मद यांना खेळताना पाहयला जायचो. तेव्हाच्या आणि आजच्या पाकिस्तानी संघात खूप मोठा फरक आहे. त्यांचा आजचा संघ हा पोपटवाडी संघ आहे. मला वाटत नाही की ते इतर संघांना जास्त आव्हान देऊ शकतील.’
मुंबई क्रिकेटच्या बोलीभाषेत ‘पोपटवाडी टीम’ हा शब्दप्रयोग एका कमकुवत संघासाठी वापरला जातो. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात ‘पोपटवाडी टीम’ हा वाक्प्रचार दिलीप सरदेसाईंसारख्या अनेक जुन्या दिग्गजांनी मोठ्या प्रमाणावर वापरला होता. त्यांनी अनेक कमकुवत गोलंदाजी आक्रमणाला ‘पोपटवाडी’ मारा असे संबोधले होते.
गावस्करांनी पाकिस्तानी संघाबद्दल असे बोलण्यामागेही कारण आहे. सध्याच्या संघात एकेकाळी असलेली वेगवान गोलंदाजीची ताकद आता दिसत नाही. आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानी संघ वेगवान गोलंदाजीऐवजी फिरकी गोलंदाजीवर अधिक अवलंबून असल्याचे दिसून आले.
भारताने कोणत्या संघांपासून सावध राहावे असे विचारले असता, गावस्कर यांनी श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे नाव घेतले. ‘श्रीलंकेकडे वेगवान गोलंदाजी आणि फिरकी दोन्ही आहेत, तर अफगाणिस्तान हा एक अतिशय अनिश्चित संघ आहे. त्यांच्याकडे रशीद खानसारखे खेळाडू आहेत. त्यामुळे भारताने या दोन्ही संघांपासून सावध राहावे,’ असा सल्ला गावस्करांनी यावेळी दिला.
भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने तीन गडी गमावून सहज गाठले. स्पर्धेत भारताचा हा सलग दुसरा विजय होता, तर टीम इंडियाचा दोन सामन्यांमधील हा पहिला पराभव ठरला.