India vs Pakistan
दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा अंतिम सामना क्रिकेटच्या मैदानावरील नाट्यमयतेमुळे नव्हे, तर पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे चर्चेत राहिला. रिंकू सिंगने विजयी धाव घेताच भारतीय संघाने जल्लोष केला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास नकार देत ती घेऊन जाण्याचे आदेश दिला. यामुळे भारतीय खेळाडूंनी पुरस्कार न घेताच स्टेडियम सोडले. (India vs Pakistan)
तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे भारताने हा सामना जिंकला. भारतीय खेळाडू विजयाच्या आनंदात असताना, सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ मात्र ड्रेसिंग रूममध्ये जाऊन एक तास दरवाजा लावून बसला. यामुळे पुरस्कार वितरण समारंभास विलंब झाला आणि स्टेडियममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघाला पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची नव्हती. भारताने ट्रॉफी देण्यासाठी एमिरेट्स बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी यांची विनंती केली, पण ACC ने ती फेटाळली. भारताची भूमिका कळताच, नक्वी यांनी ACC अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी पदके देण्याचा आग्रह धरला. एवढेच नाही, तर त्यांनी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन जाण्याचे निर्देश दिले. भारताने यापूर्वीही आशिया चषकात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे आणि प्री-टॉस फोटोशूट टाळत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मोहसिन नक्वी व्यासपीठाजवळ येताच स्टेडियममधील भारतीय समर्थकांनी त्यांना हूटिंग केले आणि "भारत माता की जय" च्या जोरदार घोषणा दिल्या. पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनाही भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
पुरस्कार वितरणादरम्यान सायमन डूल यांनी उपविजेत्या पाकिस्तान संघाला नक्वी यांच्या हस्ते पदके मिळतील अशी घोषणा केली. मात्र, नक्वी यांनी पदके देण्यास नकार दिला. अखेरीस, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी ती दिली. नक्वी यांनी सलमान अली आगाकडे उपविजेतेपदाचा धनादेश देण्यास सांगितले, पण तोही पाकिस्तानच्या कर्णधाराने फेकून दिला. यानंतर सायमन डूल यांनी, "मला ACC कडून कळविण्यात आले आहे की भारतीय क्रिकेट संघ त्यांचे पुरस्कार स्वीकारणार नाही. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा संपला आहे," अशी घोषणा केली आणि मोहसिन नक्वी यांच्यासह सर्व ACC अधिकारी स्टेडियममधून निघून गेले.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी PCB च्या कृतीवर कठोर टीका केली. "ज्या देशाचे संबंध आमच्या देशाशी सध्या चांगले नाहीत, त्यांच्या अध्यक्षांकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही, ही आमची भूमिका होती. पण याचा अर्थ त्यांना ट्रॉफी आणि पदके घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आणि अशोभनीय आहे. लवकरात लवकर ट्रॉफी आणि पदके भारताला परत करावीत. आम्ही नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या ICC परिषदेत यावर गंभीर निषेध नोंदवणार आहोत," असे सैकिया यांनी स्पष्ट केले. (India vs Pakistan)