शारजाह ; वृत्तसंस्था : पहिल्या सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वासाने भरलेला अफगाणिस्तानचा संघ आज, मंगळवारी दुसर्या सामन्यात बांगला देशविरुद्ध भिडणार आहे. हा सामना जिंकून पहिल्या सामन्यातील विजय नशिबाने लागलेली लॉटरी नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न अफगाण संघ करणार आहे, तर दुसरीकडे पहिला सामना जिंकून स्पर्धेचा प्रारंभ करण्याचा बांगला देशचा प्रयत्न असणार आहे.
अफगाणिस्तान संघाने पहिला सामना 8 विकेटस्नी जिंकला. त्यांनी श्रीलंकेला फक्त 105 धावांत गुंंडाळले आणि हे आव्हान अवघ्या 10.1 षटकांत गाठले. वेगवान गोलंदाज फजल फारुकी आणि नवीन-उल-हक यांनी श्रीलंकेच्या आघाडी फळीला 3 बाद 5 असा सुरुंग लावला, त्यातून श्रीलंकन संघ सावरला नाही. यानंतर झझाई आणि गुरबाज या सलामी फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजीचा समाचार घेत 83 धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानचा संघ आयर्लंडविरुद्धची मालिका हरून स्पर्धेत दाखल झाला होता; परंतु तो पराभव विसरून श्रीलंकेविरुद्ध त्यांनी विजय मिळवला.
शाकिब-अल-हसनचा शंभरावा टी-20 सामना
बांगला देशचा दिग्गज खेळाडू शाकिब-अल-हसन याचा हा शंभरावा टी-20 सामना असणार आहे. त्याला विजयाचे गिफ्ट देण्यासाठी सहकारी प्रयत्नशील असतील. शारजाहची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला मदत करीत असते. दोन्ही संघांत चांगले फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना कमी धावसंख्येचा होईल.