Ravichandran Ashwin on India 2027 World Cup squad pacers : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या २०२७ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी वेगवान गोलंदाजांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. जसप्रीत बुमराहचे स्थान जवळपास पक्के मानले जात असले, तरी उर्वरित तीन ते चार जागांसाठी अनेक खेळाडू शर्यतीत आहेत. अलिकडच्या काळात हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि नव्याने आलेल्या अंशुल कंबोज व आकिब नबी यांना एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
आपल्या 'ॲश की बात' (Ash ki Baat) या हिंदी यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, "विश्वचषकासाठी वेगवान गोलंदाजांमधील स्पर्धा खूप तीव्र असेल. जसप्रीत बुमराहचे स्थान पक्के आहे. मात्र, सिराजचा ज्या पद्धतीने वापर केला गेला आहे, ते पाहता तो संघात निश्चित असेलच असे सांगता येत नाही. तो संघात असावा अशी माझी इच्छा आहे, कारण त्याला तिथल्या परिस्थितीचा चांगला अनुभव आहे."
२०२३ च्या विश्वचषकापर्यंत सिराज भारतीय टीममधील अंतिम ११ मध्ये असायचा. मात्र, त्यानंतरच्या काळात त्याला एकदिवसीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. वेगवान गोलंदाजांमध्ये असणार्या स्पर्धेवर बोलताना अश्विन म्हणाला, "प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्यात प्रसिद्ध थोडा पुढे आहे, दुखापतीमुळे तो बाहेर झाला नाही तर. अर्शदीप सिंगनेही चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या डाव्या हाताच्या गोलंदाजीच्या अँगलचा विचार केला जाईल. गुरनूर ब्रारसुद्धा शर्यतीत असेल. अंशुल कंबोजलाही कमी लेखून चालणार नाही. मला वाटते की, निवडकर्त्यांना योग्य ती निवड करावी लागेल. स्पर्धेच्या वेळेस खेळाडूंचा फॉर्म आणि दुखापती पाहूनच संघ निवडला जाईल. पण हे सर्वच गोलंदाज सध्या विश्वचषकाच्या शर्यतीत कायम आहेत."
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग या तिघांना संधी देण्यात आली होती. मात्र, शमी आता या शर्यतीत मागे पडल्याचे दिसत असून अनेक नवीन चेहरे पुढे आले आहेत. २०२५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या हर्षित राणाला २०२६ मध्ये दुखापतींनी ग्रासल्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त असल्यामुळे आणि बुमराहला कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे, न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. यामध्ये अंशुल कंबोजने पहिल्याच सामन्यात 'सामनावीर' (Player of the Match) किताब पटकावत संधीचे सोने केले, तर आकिब नबीने दुसऱ्या सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले दोन बळी मिळवले आहेत.