Commonwealth Games 2026 | पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये अशोकचे पदक थोडक्यात हुकले 
स्पोर्ट्स

Commonwealth Games 2026 | पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये अशोकचे पदक थोडक्यात हुकले

जलतरणात नटराज उपांत्य फेरीत : जिम्नॅस्टिक्समध्‍ये भारताची आघाडी

पुढारी वृत्तसेवा

ग्लास्गो; वृत्तसंस्‍था : ग्लास्गो येथे सुरू असलेल्या २३ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जलतरण, पॅरा-जलतरण, लॉन बाऊल्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंग अशा विविध खेळांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. पॅरा-पावरलिफ्टिंगमध्‍ये अशोककुमार मलिकचे कांस्‍यपदक थोडक्‍यात हुकले. जलतरणात पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये श्रीहरी नटराजने उपांत्य फेरीत धडक मारली.

अशोक चौथ्‍या स्‍थानी

पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्‍ये पुरुषांचा लाईटवेट गटात भारताचा अशोककुमार मलिक २०० किलो वजनाच्या यशस्वी लिफ्टसह १४३.८ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक अगदी थोडक्यात हुकले. दुसरा भारतीय खेळाडू परमजित कुमारने १३५.६ गुणांसह सातवे स्थान मिळवले. या प्रकारात इंग्लंडच्या मार्क स्वानने १५३.९ गुणांसह सुवर्ण जिंकले. महिला लाईटवेट गटात भारताच्या जसप्रीत कौरने पहिल्याच प्रयत्नात ९५ किलो वजन यशस्वीरीत्या उचलत ९१.६ गुणांसह ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले.

जिम्नॅस्टस्‌चे उत्कृष्ट प्रदर्शन

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्‍ये भारतीय जिम्नॅस्टस्‌नी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. पुरुषांच्‍या संघाने फ्लोअर एक्सरसाईज (३२.२५०), पॉमेल हॉर्स (३१.२५०), रिंग्स (३६.०५०), वॉल्ट (३७.७५०) आणि पॅरलल बार्स (३५.४५०) मध्‍ये गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पॅरलल बार्समध्‍ये योगेश्वर सिंगला १२.७५०, तपन मोहंतीला १२.७००, तर तपेश्वरनाथ दासला १०.००० गुण मिळाले. वॉल्ट प्रकारात वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत योगेश्वर सिंगने १२.६०० तर तपेश्वरनाथने १२.०७५ ची सरासरी नोंदवली.

लॉन बाऊल्समध्ये आघाडी

लॉन बाऊल्स खेळात महिला दुहेरीत भारतीय संघाने आपली शानदार कामगिरी कायम ठेवली आहे. ग्रुप ‘बी’मधील दुसऱ्या सामन्यात भारतीय जोडीने दक्षिण आफ्रिकेचा २-० (६-४, ७-५) असा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

श्रीहरी नटराजने नोंदवली २५.५२ सेकंदांची वेळ

जलतरणात भारताच्‍या श्रीहरी नटराजने पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक हीटस्‌मध्ये २५.५२ सेकंदांची वेळ नोंदवून संयुक्त १४ वे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या प्रकारात दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कोएत्झेने २४.४५ सेकंदांसह नवीन राष्ट्रकुल रेकॉर्ड बनवले. पॅरा-जलतरण प्रकारात पुरुषांच्या एस१३ १०० मीटर फ्रीस्टाईल हीटस्‌मध्ये आरव्हीव्हीबीके बुडिगिना आणि इमाम अली यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT