पुढारी ऑनलाईन डेस्क : US Open 2024 Aryna Sabalenka : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली बेलारूसची टेनिसपटू आर्यना साबालेन्का हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. चढ-उतारांनी भरलेल्या फायनलमध्ये साबलेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 7-5, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना एक तास 53 मिनिटे चालला.
गेल्या वर्षी यूएस ओपनच्या फायनलमध्ये साबालेन्का अमेरिकन खेळाडू कोको गॉफकडून पराभूत झाली होती, मात्र यंदा तिने इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणा-या पेगुलाने साबालेन्काला कडवी झुंज दिली पण त्यात तिला बाजी मारता आली नाही. साबालेन्काने पेगुलाचे आव्हान परतवून लावले आणि यूएस ओपनवर आपले नाव कोरले.
पेगुलाने चांगली सुरुवात केली. तिने पहिल्या सेटमध्ये साबालेन्कावर 2-1 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर साबालेन्का हिने सर्व्हिस ब्रेक घेऊन खेळात पुनरागमन केले. तिने 5-2 अशी आघाडी घेतली. मात्र, पेगुलाने साबालेन्काला पहिला सेट सहजासहजी जिंकू दिला नाही आणि निर्णायक वेळी तिची सर्व्हिस ब्रेक करून स्कोअर 5-4 केला आणि नंतर 5-5 अशी बरोबरी साधली. स्कोअर लाइन 6-5 असताना, 26 वर्षीय सबालेन्काने दोन सेट पॉइंट गमावले. पण तिस-यांदा यात अपयश येऊ दिले नाही आणि पहिला सेट 7-5 ने जिंकला.
साबालेन्का दुसऱ्या सेटमध्ये अधिक प्रभावी दिसली आणि तिने सर्व्हिस ब्रेकसह 3-0 अशी आघाडी घेतली. जेसिका पेगुलाने सर्व्ह राखून सेटमध्ये आपले खाते उघडले, परंतु ती पुनरागमन करण्यापासून आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यापासून दूर होती. असे असले तरी पेगुला कोणत्याही प्रकारे पराभव स्वीकारण्यास तयार नव्हती. तिने पुन्हा एकदा साबालेन्काची सर्व्हिस ब्रेक केली. ज्यामुळे स्कोअरलाइन 3-3 अशी झाली. ती इथेच थांबली नाही आणि आणखी एक सर्व्हिस ब्रेक घेत तिने साबालेंकावर 5-3 अशी आघाडी घेतली.
साबलेन्का कठीण परिस्थितीत सापडली. पण तिने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि लगेचच आपला खेळ सुधारला. यानंतर ती पुनरागमन करण्यात यशस्वी ठरली. तिने दुसरा सेट आणि सामनाही 7-5 असा जिंकला. साबालेन्का 6-5 वर असताना तिला दोन मॅच पॉईंट मिळाले, त्यापैकी एक पेगुलाने वाचवला. पण साबालेंकाने दुसरा गुण आपल्या नावे करत पहिल्यांदाच यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.