भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना अगदी सहज जिंकला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. भारत-पाकिस्तान सामन्याची मला सामन्याइतकीच अजून एक उत्सुकता असते ती म्हणजे, पाकिस्तानी प्रेक्षकांना भेटण्याची. भारताचा कट्टर दुश्मन म्हणून जरी आपण पाकिस्तानकडे बघतो तरी सामान्य पाकिस्तानी नागरिकांना भारताबद्दलचे प्रचंड कुतूहल असते. तेव्हा त्यांना भेटल्यावर छान गप्पा होतात. यासाठी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी मीडिया सेंटर सोडून मुद्दाम प्रेक्षकांत जाऊन थोडा वेळ सामना बघतो, तोही पाकिस्तानी प्रेक्षकांच्या गोटातून. या सामन्याच्या वेळीही मी जेव्हा रिझवान आणि सौद शकील भागीदारी जमवत होते तेव्हा प्रेक्षकांत गेलो होतो; पण यंदा द़ृश्य नेहमीसारखे नव्हते. पाकिस्तानी प्रेक्षक इतके कमी आले होते आणि सगळीकडे विखुरले असल्याने मैदानावरील खेळाप्रमाणेच स्टॅडस्मध्येही भारताचेच वर्चस्व होते. तेव्हा भर सामन्यात नाही, पण सामन्याच्या आदल्या दिवशी आणि सामन्याच्या नंतर मात्र मला पाकिस्तानी प्रेक्षकांशी मनमुराद गप्पा मारता आल्या.
या सगळ्या भेटलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांत काही नमुने कायमचे लक्षात राहण्यासारखे होते. आजकाल कॅमेर्याची नजर आपल्यावर पडावी म्हणून तरतर्हेची वेशभूषा करून प्रेक्षक येत असतात. यात सियालकोटहून आलेला एक असामी भेटला. खास पाकिस्तानी हिरव्या रंगाचा ड्रेस तर त्याने घातला होता; पण छातीवर भारत आणि पाकिस्तान दोन्हींचे झेंडे होते. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने अगदी फिल्मी स्टाईल दोन्ही देश कसे एकत्र आले पाहिजेत, भारतीय खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे आम्ही हृदयापासून स्वागत करायला गेली कित्येक वर्षे तयार आहोत; पण आम्हाला संधीच मिळत नाही, वगैरे जोरदार मते मांडली; पण त्याच्या दोन झेंड्यांचे रहस्य सांगताना तो म्हणाला, ‘हम पाकिस्तानी जरूर हैं, लेकिन हिंदुस्थान की जगह हमारे दिल में हैं. इस लिये हिंदुस्थान का झंडा सीने में दिल के बाजू रखा हु’. हे त्याचे मत कॅमेर्यासाठी नसून मनापासून आलेले कळत होते. असे काही खुलेआम ऐकले की भाबडा प्रश्न पडतो तो म्हणजे, दोन देशांचे संबंध सुधारण्यात नक्की आडकाठी कुठे आहे? कदाचित हे मत तो दुबईत देत असला तरी पाकिस्तानात देऊ शकणार नाही. दर वेळी आपण संबंध सुधारायला पुढाकार घेतल्यावर पाकिस्तानने विश्वासघात केला हे सत्य आहे; पण तिथल्या सामान्य नागरिकाला भारताविषयी कुतूहल आणि प्रगतीचे आश्चर्य कायम आहे.
या थोड्याशा फिल्मी चाहत्यानंतर मी मैदानातून घरी जाताना लाहोरच्या दोन तरुण मुलांची जोडी बसमध्ये भेटली. ही मुले पाकिस्तानातून दुबईला कामधंद्यासाठी आली होती आणि मॅचच्या निमित्ताने त्यांचा स्टेडियममध्ये सामोसे विकायचा स्टॉल होता. पाकिस्तानातून बाहेर पडल्यामुळे आणि सुशिक्षित असल्यामुळे यांचा दोन्ही देशांकडे बघायचा द़ृष्टिकोन थोडा वेगळा होता. पाकिस्तानच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला आम्ही भेटत होतो तेव्हा हे दोघे भारताच्या विजयाची खात्री देत होते. पाकिस्तानी चाहते त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर खेळाडूंना ‘अर्शपर या फर्शपर’ म्हणजेच सिंहासनावर किंवा जमिनीवर बसवतात म्हणून मला वाटले हे पाकिस्तानच्या पहिल्या पराभवानंतर संघाला झोडणारे आहेत; पण पाकिस्तान का हरेल याची त्यांची कारणे अभ्यासपूर्ण होती. एक माजी पंच, एक डेटा अॅनालिस्ट निवड समितीत असणार्या संघाची निवड कधीच बरोबर असू शकत नाही. सामना हरल्यावर पाकिस्तानच्या संघ निवडीवरून जे वादळ उठले यावरून त्यांचे मत बरोबर ठरते. ती मुले मोकळेपणाने बोलत आहेत, हे बघून मी गप्पांची गाडी रूळ बदलत क्रिकेटवरून राजकारण आणि पाकिस्तानातील सुरक्षा अशा संवेदनशील विषयांवर अलगदपणे आणली. भारताची आर्थिक प्रगती, मोदी राजवटीत भारताचा जगात वाढलेला दबदबा, डिजिटल इकॉनॉमी यांची त्यांनी कसलेही हातचे न राखता स्तुती केली. ही स्तुती करताना दोन्ही एकाच वेळेला स्वतंत्र झालेल्या देशाची तुलना करताना एक देश कुठच्या कुठे पुढे निघून गेला हे सांगताना खंत दिसत असली, तरी भारताच्या प्रगतीबद्दल आकस नव्हता. असलाच तर आदर होता. पाकिस्तनात जो सुरक्षेचा बागुलबुवा केला जात आहे, तो काही ठराविक भागांपुरता मर्यादित आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद इत्यादी मोठी शहरे जगातील कुठल्याही मोठ्या शहरांचेच गुणधर्म बाळगून आहेत. लाहोरचे आदरातिथ्य बघायला त्याने मला पाकिस्तानचे निमंत्रण दिले. यंदा तरी हे शक्य नाही म्हटल्यावर सामन्याच्या दिवशी त्याच्या स्टॉलवर येऊन सामोसे खायचे आग्रहाचे आमंत्रण दिले.
पाकिस्तानी नागरिकांना मी या चार दिवसांत न्याहाळत असताना पुन्हा एक पाकिस्तानी जोडगोळीचं माझ्या मदतीला धावून आली. दुबईचे स्टेडियम गाठणे म्हणजे एक दिव्य आहे, हे मागच्या लेखात सांगितले आहेच. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पंचवीस हजार प्रेक्षक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून वेळेत घरी जाणे निव्वळ अशक्य. एकच बस तिथे येते ती दर अर्ध्या तासाने आणि त्यात जास्त प्रवासी कोंबायची सोय नाही. सामन्यासाठी जादा गाड्या सोडायची भानगड नाही. टॅक्सी मिळत नाही आणि नेटवर्क बंद पडल्याने ‘उबर’ वगैरेचा पर्यायही नाही आणि असलाच तरी त्या गर्दीत गाडी येणे नाही. मला स्टेडियमवरून थेट विमानतळ गाठायचे होते, तेव्हा बॅग आणि लॅपटॉप सांभाळत त्या गर्दीत मी हताशपणे उभा होतो. इतक्यात एक टॅक्सी आली. त्यात पॅसेंजर दिसत होता; पण तरी मी काच खाली करून मला कुठेतरी वाटेत सोडायची विनंती केली. त्या टॅक्सी ड्रायव्हर आणि पॅसेंजरचे बोलणे झाले आणि त्यांनी मला गाडीत घेतले. तो पॅसेंजर लाहोरचा होता, तर टॅक्सी ड्रायव्हर खैबर पख्तुन भागातला होता. विमानतळावर जायला दीड तास लागला आणि पाकिस्तानच्या गरिबीचे एक अंग त्या टॅक्सीवाल्याकडून कळले. तो स्वतः एकेकाळी क्रिकेटपटू होता. ऐंशीच्या जमान्यात आपण पाकिस्तानकडून अनेकदा हरलो आहोत, याची आठवण मी करून दिली, तर त्याचे वाक्य अजब होते. तो म्हणाला, ‘हिंदुस्थान कभी हारता हैं तो हमे खुशी नही होती.’ अनेक सामान्य पाकिस्तानी नागरिकांना भेटल्यावर एकच जाणवते ते म्हणजे, आपण फक्त देशाच्या सीमारेषेने विभक्त झालो आहोत. दोन देशांच्या संबंधांची दिशा ठरवायला मी काही राजकीय विश्लेषक नाही; पण दोन देशातले सामान्य नागरिकच हे संबंध सुधारायला हातभार लावू शकतात, असे राहून राहून वाटते.