अबुधाबी; वृत्तसंस्था : आशिया चषक स्पर्धेत ओमानविरुद्ध झालेल्या गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. ही कामगिरी करणारा तो जगातील तिसरा सर्वात जलद गोलंदाज आहे. याच सामन्यात, अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तो आता युजवेंद्र चहलच्या बरोबरीने देशासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना विकेटस् मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तेव्हा अर्शदीप आणि हार्दिकने दमदार कामगिरी केली. 26 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपला आपल्या 100 व्या विकेटसाठी सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने बाऊन्सर टाकला. या चेंडूवर फलंदाज विनायक शुक्लाने जोरदार पुल शॉट मारला, पण बदली खेळाडू रिंकू सिंगने सोपा झेल टिपला आणि या विकेटसह अर्शदीपने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा गाठला.
तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अर्शदीपने ही कामगिरी केवळ 64 सामन्यांमध्ये केली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये तो सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे, त्याने पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफचा 71 सामन्यांचा विक्रम मोडला. एकूण गोलंदाजांच्या यादीत तो अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान (53 सामने) आणि वानिंदू हसरंगा (63 सामने) यांच्यानंतर तिसर्या क्रमांकावर आहे. अर्शदीपने 64 सामन्यांमध्ये 18.49 च्या सरासरीने 100 बळी घेतले आहेत.