दोहा; वृत्तसंस्था : भारताचा अव्वल ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत अचूक ‘एंडगेम’च्या जोरावर जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव या दिग्गजांना पराभवाचा धक्का दिला. या एकापेक्षा एक सरस विजयासह अर्जुन फिडे 11 व्या फेरीअखेर 9 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचला आहे.
संयुक्तपणे अव्वल स्थानी असलेल्या अर्जुन एरिगेसी आणि फ्रान्सच्या मॅक्सिम वाशियर-लाग्राव्ह यांच्यानंतर डॅनिल ड्युबोव्ह, अमेरिकेचा फॅबियानो कारुआना आणि चीनचा यू यांगी 8.5 गुणांसह दुसर्या स्थानी आहेत. कार्लसन, अव्वल मानांकित अलीरेझा फिरोझा आणि भारताचा सुनीलदत्त नारायणन यांच्यासह आठ खेळाडू 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. आर. प्रज्ञानंद आणि विद्यमान क्लासिकल विश्वविजेता डी. गुकेश 7.5 गुणांसह 14 व्या स्थानी असलेल्या 21 खेळाडूंच्या गटात आहेत.
हंपी, दिव्या देशमुख पिछाडीवर
रॅपिड प्रकारात कांस्यपदक जिंकणार्या कोनेरू हंपीला ब्लिट्झमध्ये 5 गुणांसह संयुक्तपणे 61 व्या क्रमांकावर घसरली. दिव्या देशमुखला 6 गुणांसह संयुक्त 30 वे स्थान मिळाले.
कार्लसनचा संताप पुन्हा अनावर
ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारू शकत नसल्याचे आणखी एकदा समोर आले. अर्जुनकडून पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर कार्लसनने संतापून टेबलावर जोरात हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाला असून, नेटकर्यांनी याला ‘कार्लसनचा संताप 2.0’ अशी उपरोधिक उपमा दिली.