आंद्रे रसेल Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Andre Russell | जाता जाता विश्वविक्रम! रसेलने शेवटच्या सामन्यात रचला इतिहास

Arun Patil

पुढारी ऑनलाईन : वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी साकारली. टाळ्यांचा कडकडाट, प्रतिस्पर्धी खेळाडूंनी दिलेला 'गार्ड ऑफ ऑनर' आणि आपल्या स्फोटक खेळीने चाहत्यांची जिंकलेली मने जिंकली. या अविस्मरणीय वातावरणात वेस्ट इंडिजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा सलाम ठोकला. या सामन्यात केवळ वादळी खेळीच केली नाही, तर एक अनोखा विश्वविक्रमही आपल्या नावे केला.

दोन्ही संघांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ने सन्मान

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना रसेलच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी रांगेत उभे राहून त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. या सन्मानाला उत्तर देताना रसेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने केवळ १५ चेंडूंत २ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांसह २४० च्या स्ट्राइक रेटने ३६ धावांची तुफानी खेळी साकारली. ज्या आक्रमक शैलीसाठी तो ओळखला जातो, त्याच शैलीत खेळून त्याने चाहत्यांना एक अविस्मरणीय भेट दिली.

जाता जाता एका अनोख्या विश्वविक्रमावर कोरले नाव

आपल्या शेवटच्या सामन्यात ४ षटकार मारताच रसेलने एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक न झळकावता १५० पेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याची ही कामगिरी त्याला इतर पॉवर-हिटर्सपेक्षा वेगळे ठरवते.

एकही शतक न लगावता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार

आंद्रे रसेल १५२ (१२३ डाव)

टिम साउथी १४२ (३०२ डाव)

कॉलिन्स ओबुया ११४ (१५९ डाव)

जेजे स्मिट १०८ (९४ डाव)

मशरफे मोर्तझा १०७ (२६४ डाव)

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

या लढतीत विंडीजने 20 षटकांत 8 बाद 172 धावा केल्या तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 15.2 षटकांतच 2 बाद 173 धावांसह एकतर्फी विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियातर्फे जोश इंग्लिसने 33 चेंडूंत 7 चौकार, 5 षटकारांसह 78 तर कॅमेरून ग्रीनने 32 चेंडूंत 56 धावा चोपल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT