वॉशिंग्टन डी.सी. : जगभरातील फुटबॉल चाहत्यांना ज्या क्षणाची आतुरता होती, त्या २०२६ फिफा विश्वचषकाचे 'ग्रुप टप्प्याचे ड्रॉ' नुकतेच अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जाहीर झाले. ५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात एक ऐतिहासिक घटना घडली. फुटबॉल विश्वातील सर्वोच्च संस्था 'फीफा'ने प्रथमच शांतता पुरस्काराची घोषणा करत, तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊन त्यांचा सन्मान केला.
अमेरिकेसह कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या 'ड्रॉ' समारंभाची सुरुवात होण्यापूर्वीच, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (FIFA) अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना हा मानाचा पुरस्कार सुपूर्द केला. या पुरस्कारांतर्गत ट्रम्प यांना खास ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना इन्फेंटिनो यांनी या पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘आजचे जग अस्थिर आणि विभागलेले आहे. अशा काळात जे लोक आपापसातील तणाव संपवून लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत, त्यांच्या अभूतपूर्व कार्याला मान्यता देणे गरजेचे आहे.’ शांततेसाठी ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांची दखल घेऊनच 'फीफा'ने हा सन्मान त्यांना बहाल केल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला यजमान देशांचे प्रतिनिधी म्हणून कॅनडाचे मार्क केनेरी त्यांच्या पत्नीसह आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष देखील उपस्थित होते.
खेळप्रेमींसाठी २०२६ हे वर्ष फुटबॉलच्या दृष्टीने खूप मोठे ठरणार आहे. हा विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये खेळला जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात ११ जून २०२६ रोजी होणार असून, अंतिम सामना १९ जुलै रोजी न्यू जर्सी येथील 'मेटलाईफ स्टेडियम' येथे खेळला जाईल. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ४८ संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. यापैकी ४६ संघ थेट पात्र ठरतील, तर उर्वरित २ संघ आंतरखंडीय प्लेऑफद्वारे आपली जागा निश्चित करतील.
केप व्हर्दे, उझबेकिस्तान आणि जॉर्डन हे तीन संघ या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच विश्वचषकात खेळताना दिसतील, ज्यामुळे स्पर्धेतील उत्साह द्विगुणित होणार आहे. २०२६ चा विश्वचषक केवळ फुटबॉलचा महाकुंभ नसेल, तर शांततेच्या संदेशासह एका नव्या आणि मोठ्या पर्वाची सुरुवात करणारा असेल यात शंका नाही.