दुबई : वृत्तसंस्था
सध्या उत्तम बहरात असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने आयसीसी महिला मानांकन यादीत तब्बल 9 क्रमांकाची मोठी झेप घेत थेट चौथ्या स्थानावर कब्जा केला. हिलीने नुकत्याच विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तिने 107 चेंडूंमध्ये 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 142 धावांची शानदार खेळी केली. या अप्रतिम कामगिरीमुळे तिला आयसीसी क्रमवारीत मोठे यश मिळाले असून, तिचे रेटिंग आता 700 झाले आहे. सध्या तिच्या पुढे केवळ ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी, इंग्लंडची नॅट सायव्हर-ब्रंट आणि भारताची स्मृती मानधना आहे.
भारतीय फलंदाज स्मृती मानधना महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. तिचे रेटिंग 793 आहे. तिच्या पाठोपाठ नॅट सायव्हर-ब्रंट (746) आणि बेथ मुनी (718) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहेत. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्टलाही फायदा झाला असून, तिने 3 क्रमांकांची प्रगती करत चौथे स्थान गाठले आहे. न्यूझीलंडची सोफी डिवाईन सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी आणि ॲश्ले गार्डनर यांना क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे. पेरी एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर ॲश्ले गार्डनर 3 स्थानांनी खाली येत आठव्या क्रमांकावर आली आहे. टॉप 10 मध्ये पाकिस्तानची सिदरा अमीन नवव्या स्थानी आहे, तिने एका स्थानाची प्रगती केली आहे. या क्रमवारीत सर्वाधिक नुकसान दक्षिण आफ्रिकेच्या ताझमिन ब्रिटस्ला झाले असून, ती थेट 6 स्थानांनी घसरून दहाव्या क्रमांकावर आली आहे.