US Open 2026 | झ्वेरेव्हने पटकावले दुसरे ग्रँडस्लॅम 
स्पोर्ट्स

US Open 2026 | झ्वेरेव्हने पटकावले दुसरे ग्रँडस्लॅम

बेन शेल्टनचे आव्हान संपुष्टात

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्‍था : जर्मनीच्या जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने अमेरिकन प्रतिस्‍पर्धी बेन शेल्टनचा पराभव करत अमेरिकन टेनिस ग्रँडस्‍लॅमच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. निर्णायक अंतिम सामन्यात झ्वेरेव्हने चार सेटस्‌मध्ये ६-३, ७-६(२), ५-७, ६-२ असा ३ तास ३३ मिनिटांत विजय मिळवला. या विजयासह अमेरिकेचा पुरुष गटातील २३ वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे शेल्टनचे स्वप्न अपूर्ण राहिले.

टोकियो २०२० ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या २९ वर्षीय झ्वेरेव्हचे हे कारकिर्दीतील २६ वे जेतेपद आहे. यापूर्वी त्याने यंदा जून महिन्यात फ्रेंच ओपन जिंकून कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावले होते. २०२० च्या अमेरिकन ओपन फायनलमध्ये डॉमिनिक थिएमकडून झालेल्या पराभवानंतर, तब्बल सहा वर्षांनी झ्वेरेव्हने याच कोर्टवर बाजी मारत जुन्या पराभवाची परतफेड केली.

पुरस्कार वितरण समारंभात झ्वेरेव्ह म्हणाला, ‘गेल्या ३० वर्षांत आम्ही एकही ग्रँडस्लॅम जिंकू शकलो नव्हतो. मात्र, आता अवघ्या तीन महिन्यांत आम्ही दोन जेतेपदे मिळवली आहेत. २०२६ चे यश हे आधीच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT