ब्रिस्बेन : ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गॅबा मैदानावर खेळला जात आहे. हा सामना डे-नाईट असून गुलाबी चेंडूवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अॅलेक्स केरी हा चर्चेचा विषय ठरला. यष्टीमागे त्याची कामगिरी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट राहिली. त्याने वेगवान गोलंदाजांचे उसळते चेंडू सहजपणे झेलले. पण, केरीने दिवसाची कमाल तेव्हा केली, जेव्हा त्याने मागे धाव घेत इंग्लंडच्या गुस ॲटकिन्सनचा एक जबरदस्त आणि अविश्वसनीय असा झेल टिपला.
हा थरार इंग्लंडच्या डावातील ६७ व्या षटकात घडला. ॲटकिन्सनने चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून यष्टिरक्षकाच्या मागे हवेत उंच उडाला. चेंडू पकडण्यासाठी केरी आणि नजीक उभा असलेला क्षेत्ररक्षक मार्नस लाबुशेन दोघेही मागे धावले. क्षणाचाही विलंब न लावता दोघांनीही चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी झेप घेतली.
यावेळी, केरीने आपले टायमिंग अचूक साधले. त्याने हवेत सूर मारून गुलाबी चेंडू आपल्या हातात पकडला. विशेष म्हणजे, झेल घेत असताना लाबुशेन धावताना थेट केरीला धडकला. इतकी मोठी धडक बसूनही केरीने चेंडू आपल्या हातातून निसटू दिला नाही. हा त्याचा एकाग्रतेचा परमोच्च बिंदू होता. जमिनीवर पडलेल्या केरीला मार्नसने लगेच मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. केरीच्या या अप्रतिम कामगिरीमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा 'वॉव' म्हणायला लावणारा क्षण मिळाला.
गॅबाच्या मैदानावर गुलाबी चेंडूने रंगलेला हा दिवस अत्यंत आकर्षक ठरला. एका बाजूला मिचेल स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाची बाजू सांभाळली, तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा फलंदाज जो रूटने जबरदस्त झुंज दिली.
स्टार्कने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत एकट्याने ६ बळी घेतले आणि इंग्लंडला एकापाठोपाठ झटके दिले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलग तिसऱ्यांदा ६ बळी घेण्याचा हा त्याचा पराक्रम आहे.
दरम्यान, जो रूटने ऑस्ट्रेलियातील आपला १२ वर्षांचा शतकाचा दुष्काळ अखेर संपवला. त्याने कसोटीतील पहिले शतक ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर झळकावून संघाला मजबूत स्थितीत नेले. दिवसाच्या शेवटच्या विकेटसाठी त्याने जोफ्रा आर्चरसोबत ६१ धावांची आक्रमक आणि अभेद्य भागीदारी केली. दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने ९ बाद ३२५ धावांपर्यंत मजल मारली.
शेवटच्या ३० मिनिटांत इंग्लंडने डिक्लेअर करणार असल्याचा 'माईंड गेम' ऑस्ट्रेलियासोबत खेळला, ज्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला, परंतु त्यांनी अखेरपर्यंत फलंदाजी सुरू ठेवली.