स्पोर्ट्स

अजिंक्य रहाणे KKRचा कॅप्टन! IPLपूर्वी फ्रँचायझीची मोठी घोषणा

Ajinkya Rahane KKR Captain IPL 2025 : अय्यर उपकर्णधार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) फ्रँचायझीने मोठी घोषणा केली आहे. त्यांनी अजिंक्य रहाणेला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर व्यंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. (Ajinkya Rahane KKR Captain IPL 2025)

रहाणे KKRचा 9वा कर्णधार

रहाणे हा केकेआरचा 9वा कर्णधार असणार आहे. त्याच्या आधी सौरव गांगुली (27 सामने), ब्रेंडन मॅक्युलम (13 सामने), गौतम गंभीर (122 सामने), जॅक कॅलिस (2 सामने), दिनेश कार्तिक (37 सामने), इऑन मॉर्गन (24 सामने), श्रेयस अय्यर (29 सामने) आणि नितीश राणा (14 सामने) यांनी संघाचे नेतृत्व केले आहे.

रहाणेसाठी मोजले दीड कोटी

रहाणे गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळला होता. फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. अशा परिस्थितीत, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात, कोलकाता फ्रँचायझीने रहाणेला 1.50 कोटी रुपये या त्याच्या मूळ किमतीमध्ये खरेदी केले होते.

रहाणेला कर्णधार बनवल्याबद्दल केकेआर फ्रँचायझीचे सीईओ वेंकट म्हैसूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू आम्हाला मिळाल्याने खूप आनंद आहे. त्याच्याकडे आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आणि परिपक्वता आहे. तसेच, व्यंकटेश अय्यर केकेआरचा स्टार खेळाडू आहे. त्याच्याकडे अनेक देखील नेतृत्वगुण आहेत. आम्हाला खात्री आहे की अगामी आयपीएलच्या हंगामात हे दोन दिग्गज खेळाडू आमचे विजेतेपद राखण्यासाठी चांगली कामगिरी करतील.’
केकेआर फ्रँचायझीचे सीईओ वेंकट म्हैसूर
केकेआरच्या नेतृत्वाची भूमिका स्वीकारताना रहाणे म्हणाला, ‘आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या केकेआरचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा सन्मान आहे. मला वाटते की आमचा संघ एक उत्तम आणि संतुलित आहे. मी सर्वांसोबत काम करण्यास आणि आमच्या संघाचे विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान स्वीकारण्यास उत्सुक आहे.’
अजिंक्य रहाणे

कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेवर जेतेपद राखण्यासाठी दबाव असेल. यावेळी केकेआर 22 मार्च रोजी आपली मोहीम सुरू करेल. ईडन गार्डन्सवर त्यांची लढत आरसीबी संघाशी आहे.

रहाणेची आयपीएल कारकीर्द

36 वर्षीय रहाणे हा आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने या लीगमध्ये एकूण 185 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 30.14 च्या सरासरीने 4642 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 30 अर्धशतके आणि 2 शतके आहेत. त्याच वेळी, रहाणेने केकेआरसाठी 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 133 धावा केल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, रहमानउल्ला गुरबाज, एन्रिख नोर्किया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक

श्रेयसच्या नेतृत्वाखाली KKR चॅम्पियन

गेल्या हंगामात श्रेयस अय्यर KKRचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपदही पटकावले. केकेआर संघाचे हे तिसरे आयपीएल जेतेपद होते. पण 2025 च्या आयपीएलपूर्वी केकेआर फ्रँचायझीने श्रेयस अय्यरला रिलीज केले. अशा परिस्थितीत, मेगा लिलावात, पंजाब किंग्ज (PBKS) ने श्रेयसला 26.75 कोटींची बोली लावून खरेदी केले आणि त्याला संघाचा कर्णधारही बनवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT