Ajinkya Rahane Fined pudhari
स्पोर्ट्स

Ajinkya Rahane Fined: रहाणेचं म्हणजे 'खाया पिया कुछ नही, खाली गिलास तोडा १२ लाख का'... KKR कर्णधारावर BCCI ने केली कारवाई?

Anirudha Sankpal

Ajinkya Rahane Fined: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणासाठी यंदाचा आयपीएल हंगाम हा एका वाईट स्वप्नासारखाच ठरतोय. केकेआरसाठी हंगामातील पाच सामने झाले तरी अजून एक विजय त्यांच्या पदरात पडलेला नाही. त्यातच आता कर्णधार अजिंक्य रहाणेने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लघंन केल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यावेळी अजिंक्य रहाणेने कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केलं होतं.

बीसीसीआयने अजिंक्य रहाणेवर सामन्यावेळी षटकांची गती कमी ठेवल्याप्रकरणी कारवाई केली आहे. केकेआर कर्णधाराचा हा यंदाच्या हंगामातील आयपीएल कोड ऑफ कंडक्ट नियम २.२२ चे पहिले उल्लंघन आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेवर १२ लाख रूपये दंड लावण्यात आला आहे.

अजिंक्य ठरला चौथा कर्णधार

विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएल हंगामातील अजिंक्य रहाणे हा चौथा कर्णधार आहे ज्याच्यावर षटकांची गती संथ राखल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी श्रेयस अय्यरवर दोनवेळा नियमाचे उल्लंघन केल्याचा ठवपका ठेवण्यात आला होता. त्याला पहिल्यांदा १२ तर नंतर २४ लाख रूपये दंड ठोठावण्यात आला होता.

यानंतर शुभमन गिलने देखील दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवली होती. त्याचबरोबर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने देखील हाच गुन्हा दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध केला होता. त्या दोघांनाही प्रत्येकी १२ लाख रूपयांचा दंड करण्यात आला आहे.

केकेआर रसातळाला

२०२४ च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआरसाठी २०२६ चा हंगाम वाईट ठरत आहे. त्यांना पहिल्या पाच सामन्यात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी मुंबईसोबतचा पहिला सामना आणि त्यानंतर सनाईजर्स हैदराबादसोबतचा दुसरा सामना गमावला. त्यानंतर वरूणराजाची कृपा झाली अन् पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात त्यांना एक गुण बहाल करण्यात आला.

गुणांचे खाते उघडलेल्या केकेआरला लखनौविरूद्धचा सामना गमवावा लागला. पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जने देखील त्यांना मत दिल्यानं त्यांच्या विजयाची पाटी कोरीच राहिली आहे. गेल्या हंगामात देखील शेवटचे दोन सामने केकेआरने गमावले होते. त्यामुळं त्यांनी आता सलग सहा सामने गमावले आहेत. आयपीएल २००९ मध्ये त्यांनी सलग ९ सामने गमावले होते. आता हे रेकॉर्ड केकेआर मोडणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT