मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर यांच्यासह माजी महिला कर्णधार डायना एडलजी तसेच शाह आलम शेख, विहंग सरनाईक आणि सूरज समत यांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला.
आता उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य या पदांसाठी निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी डायना एडलजी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, नवीन शेट्टी, प्रसाद लाड, राजदीप कुमार गुप्ता, शाह आलम शेख, सूरज समत, विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केले होते. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांच्यात लढत होईल.
कुलिंग पीरियडच्या नियमानुसार, अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केलेल्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा अर्ज माघारी घेतला. मात्र, सेक्रेटरीपदासाठी त्यांनी दावेदारी कायम ठेवली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमोल काळे यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत संजय नाईक यांचा पराभव केला. अजिंक्य हे 23 जुलै 2024 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. त्यावेळी ते 38 वर्षांचे होते. अध्यक्षपदापूर्वी 2019 ते 2022 या कालावधीमध्ये कार्यकारिणी सदस्य तसेच 2022 ते 2024 या काळात सचिव म्हणून कार्यरत होते.
अध्यक्ष : अजिंक्य नाईक बिनविरोध
उपाध्यक्ष : जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी
सचिव : शाह आलम शेख विरुद्ध डॉ. उन्मेष खानविलकर
सहसचिव : गौरव पय्याडे विरुद्ध नीलेश भोसले
खजिनदार : अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे
एमसीए हे एक कुटुंब आहे. वैचारिक वाद आणि मतभेद असतात. निवडणुकाही होतात, पण आम्ही सर्व मिळून काम करू. ज्येष्ठ प्रशासक शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. फडणवीस यांनी नवीन स्टेडियम बांधण्याबाबत सुतोवाच केले होते. त्यानुसार नक्कीच आम्ही करू, असे अजिंक्य नाईक म्हणाले.
प्रसाद लाडला ग्लॅमरची गरज नाही. उभा राहतो तिथे ग्लॅमर निर्माण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि शरद पवार यांनी मिळून एक यादी ठरवली होती. त्यानुसार आम्हाला होईल असे वाटल होते.. बघूया पुढे काय होते, असे भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.
सर्वांच्या सोबत राहायचे असते, असे शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले. वरिष्ठांनी अर्ज माघारी घेण्यास सांगितले. त्यानुसार निर्णय घेतला. एकदम पुढे जायचे नसते. हळूहळू जायचे असते. आता आमदार झालो आहे. बघूया पुढे काय करता येईल, असे ते पुढे म्हणाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. शहर दिवाणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. शाह आलम शेख यांनी अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान दिले होते. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नसल्याचा दावा शाह आलम शेख यांचा होता. सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळ एकच असल्याने कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे अजिंक्य नाईक यांनी म्हटले होते.