MCA President Election
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष म्हणून विद्यमान सचिव अजिंक्य नाईक निवडून आले. Twitter
स्पोर्ट्स

MCA President Election: अजिंक्य नाईक एमसीएचे नवे अध्यक्ष, आशिष शेलारांच्या उमेदवाराचा पराभव

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष म्हणून विद्यमान सचिव अजिंक्य नाईक निवडून आले. अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानंतर हे रिक्त पद रिक्त झाले होते. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांच्यावर विजय मिळवला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना 221 तर संजय नाईक यांना 114 मते पडली. अजिंक्य हे 107 मतांच्या फरकाने निवडून आले. मागील निवडणुकीत सर्वाधिक 286 मते मिळवणार्‍या अजिंक्य नाईकांनी काल झालेल्या निवडणुकीतही वर्चस्व राखले. 37 वर्षीय अजिंक्य हे एमसीएचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत.

एमसीएच्या मतदारांमध्ये मैदान क्लब (211), ऑफिस क्लब (77), शाळा आणि महाविद्यालय क्लब (37) तसेच माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू (50) अशा एकूण 375 मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी 335 मतदारांनी हक्क बजावला. राजकारण्यांच्या पडद्यामागील पाठिंब्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रंगत आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले देखील अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वेळ काढून मतदान केले. मैदान क्लबसह माजी क्रिकेटपटूंनीही मतदान करण्यात रस दाखवला.

निवडणुकीत अजिंक्य नाईक, संजय नाईक यांच्यासह विहंग सरनाईक आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचा अर्ज बाद ठरला, तर निवडणुकीच्या एक आठवडा आधी भूषण पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे या निवडणुक अजिंक्य नाईक आणि संजय नाईक यांच्यात पार पडली. ज्यात अजिंक्य सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले.

SCROLL FOR NEXT